बदलापूरमधील नामांकित शाळेतील चिमुकलींवर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला होता. ठाणे क्राईम ब्राँच युनिट 1 मध्ये अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल होता. त्याचा तपास करण्यासाठी ठाणे क्राईम ब्राँच तळोजा जेलमध्ये गेले होते. त्यानंतर त्याला बदलापूरला घेऊन जात असताना अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि तीन राऊंड फायर केले. यामधील एक गोळी API निलेश मोरे या पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला लागली तर इतर दोन राऊंड मिसफायर झाले. त्यानंतर सेल्फ डिफेन्ससाठी पोलीस अधिकाऱ्याने त्याला गोळ्या घातल्या. यामध्ये अक्षय शिंदे आणि जखमी पोलीस अधिकारी यांना कळवा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्याला उपचारासाठी नेत असताना अक्षय याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. मात्र अद्याप अधिकृतपणे पोलिसांनी याबाबत काही माहिती दिलेली नाही. या प्रकरणावर उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठी शंका व्यक्त करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
ही घटना शॉकिंग धक्कादायक आहे. पण आरोपीने स्वत: वर गोळी झाडून घेतली इतकी साधेपणाने पाहण्यासारखी घटना नाही. हैदराबादमध्ये जेव्हा घटना घडली, बलात्कार झाला. तेव्हा चार आरोपींचा एन्काऊंटर झाला. ही घटना ज्या बदलापूरच्या शाळेत घडली, त्या शाळेचा संबंध, आपटे फरार आहे. त्याला अटक झाली नाही. अशा परिस्थितीत अक्षय शिंदे आरोपी आहे. पण अक्षयला या प्रकरणात गोवलं जात आहे, असं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत त्याने गोळी मारून घेतली की अजून काही झालंय? की त्याला कोणी नाईलाजाने गोळी मारली की यातून अजून काही प्रकरण आहे, याच्या मुळाशी जाऊन चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.