संजय राऊतांकडून माझा पाठलाग, फोन करून…; ‘दादा’ म्हणत महिलेचं उद्धव ठाकरेंना पत्र
Swapna Patkar Latter to Uddhav Thackeray : खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिण्यात आलं आहे. यात मला न्याय हवा आहे. उद्धव ठाकरेंनी याबाबत ठोस भूमिका घ्यावी, असं म्हणण्यात आलं आहे. कुणी लिहिलं हे पत्र? वाचा सविस्तर..
बदलापूरमध्ये शाळकरी मुलींच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत आवाज उठवला. महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तोंडाला काळा मास्क लावत दादरमधील शिवसेनाभवन समोर निषेध आंदोलन केलं. त्यानंतर आता महिला सुरक्षेबाबत उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिण्यात आलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.
संजय राऊत यांच्यावर आरोप असलेल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. 2022 ला एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात संजय राऊतांनी पाटकर यांना शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आला होता. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर देखील नोंदवला होता. त्याच सगळ्याची आठवण स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरेंना करून दिली आहे. महिला सुरक्षेवर बोलत असताना संजय राऊतांनी जे माझ्यासोबत केलं. त्यावर बोला, असं स्वप्ना पाटकर यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. स्वप्ना पाटकर या सिनेमा दिग्दर्शिका आणि मनसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांचं स्वत:चं क्लिनिक देखील आहे. पाटकर यांचं ट्विट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रिट्विट केलं आहे. उद्धव ठाकरेजी, तुमच्या उत्तराची महाराष्ट्र वाट पाहतोय, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
स्वप्ना पाटकर यांचं पत्र
नमस्कार उद्धवदादा,
महिला सुरक्षितते बद्दल तुम्हाला बोलताना ऐकून खूप आनंद झाला. “नराधमांना तर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांवर दबाव आणला असेल, तर दबावाखाली आलेले पोलीस सुद्धा नराधमांएवढेच विकृत आहेत.” असे तुमचे ट्विट वाचून बरं वाटले.
मी 2016 ते 2021 तुम्हाला अनेक ईमेल लिहिले. सत्य परिस्थिती कळवली. संजय राऊत कसे माझा पाठलाग करत होते, मला धमकावत होते आणि त्यांच्या शिवाय इतर कोणा सोबत काम करू देणार नाही असं म्हणून घाबरवण्याचा प्रयत्न करत होते, हे मी फार स्पष्ट आपल्याला कळवले होते. माझावर हल्ले झाले, मला वेग वेगळ्या पोलीस स्टेशनला संबंध नसताना बोलावले जायचे, माझे काम बंद करण्यात आले, घरा बाहेर काढणार हा दबाव टाकला गेला. सगळे माहित असून तुम्ही काहीच मदत केली नाही. याचे मात्र मला वाईट वाटले.
माझा एक चित्रपट ” डॉक्टर रखमाबाई “रिलीज होऊ दिला नाही. माझे आणि अनेक कलाकारांचे प्रचंड नुकसान तुम्ही केले असे मला राऊत यांच्याकडून सांगण्यात आले. पण मला वाटत नाही तुम्ही असं कराल. त्यांनीच केले हे मला माहित आहे. फोन वर शिव्या गाळ, घर उध्वस्त केले, काम बंद करून जगण्याचे साधन संपवले. हे सगळे माहित असून देखील तुम्ही त्यांना पूर्ण शिवसेना हातात दिली. आणि त्यांनी माझी वाट लावली तशीच पक्षाची वाट लावली. असो. आता तुम्ही बहीणी साठी लढायला तयार आहात म्हणून विचारते. या बहिणीसाठी तुम्ही काय करणार ते महाराष्ट्राला नक्की सांगा. मी वाट पाहत आहे. तुमची लाडकी बहीण, स्वप्ना पाटकर.
नमस्कार @OfficeofUT दादा, तुमची लाडकी बहीण @drswapnapatker pic.twitter.com/osYZTUbiFQ
— I AM SWAPNA (@drswapnapatker) August 26, 2024