अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा, दादांचं मात्र मौन; पडद्याआड काय घडतंय?
एरवी अजित पवार विस्तृत बोलतात. तितकेचं रोखठोक बोलतात. त्यात काही तत्थ्य नाही. असं बोलून दोन दिवस झाले.
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे नाराज असल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या. त्यानंतर शरद पवार किंवा अजित पवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली नाही. मला माहीत नाही, असं शरद पवार म्हणाले. तर, त्यात काही तत्थ्य नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. ही बातमी चुकीची आहे. एवढंच ते बोलले. एरवी अजित पवार विस्तृत बोलतात. तितकेचं रोखठोक बोलतात. त्यात काही तत्थ्य नाही. असं बोलून दोन दिवस झाले. पण, अजित पवार यांच्या नावाची चर्चा काही थांबली नाही.
अजित पवार हे अस्वस्थ
शिवसेनेचे मंत्री दादा भुसे म्हणाले, एक गोष्ट आपण सगळे पाहत आहोत. अजित पवार हे अस्वस्थ आहेत. हे गेल्या काही वर्षांपासून आपण पाहत आहोत. मग काहीपण होऊ शकतं, असंही त्यांनी म्हंटलं.
राष्ट्रवादीत त्यांची घुसमट
प्रवीण दरेकर म्हणाले, अजित पवार आमच्यात येणार की नाही, याची मला काही कल्पना नाही. महाविकास आघाडीत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची घुसमट सुरू आहे.
सत्ता संघर्षाचा निकाल जवळ
सर्वोच्च न्यायालयातील सत्ता संघर्षाचा निकाल जवळ आहे. त्यावरून उलटसुलट चर्चा आहेत. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी करून भाजपची साथ दिली होती. जर शिंदे यांचे आमदार अपात्र होऊन सरकार पडलं तर अजित पवार सोबत येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काकांविरोधात बंड करणार का?
तसं झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण ५३ आमदारांपैकी २ तृतांश म्हणजे ३६ आमदार अजित पवार यांच्याकडे हवेत. अजित पवार यांनाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन पुन्हा सरकार येऊ शकते, अशीही चर्चा आहे. पण, अजित पवार भाजपसोबत जाऊन काका शरद पवार यांच्या विरोधात बंड करणार का, हाही सवाल उपस्थित होत आहे.
आमचा विश्वासघात झाला होता
शरद पवार यांच्या सांगण्यावरून पहाटेचा शपथविधी झाल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यानंतर तो निर्णय बदलून आमचा विश्वासघात झाला होता. आता खरचं अजित पवार भाजपची साथ देणार का, हे कुणीच सांगू शकणार नाही. कारण राजकारण केव्हा काय होईल, हे सांगता येत नाही.