पहिल्यांदाच इशारा… तानसा भरून वाहू लागला, ‘या’ गावांसाठी अलर्ट?
मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव भरुन वाहत असताना आता तानसा तलाव देखील भरुन वाहण्याची शक्यता असल्याने मुंबई महानगर पालीकेने काठावरील गावांना अलर्ट जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात कोसळणाऱ्या पावसाने मुंबई महानगर पालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या तुळशी तलाव ओसंडून वाहत असताना आता तानसा धरण देखील भरुन वाहण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. तानसा धरणाची पातळी 127.51 मी.मी. टीएचपी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी 128.63 मी. टीएचपी इतकी आहे. तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण लक्षात घेता तानसा धरण लवकरच भरुन वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
तानसा धरणाखाली आणि तानसा नदीलगतच्या परिसरातील शहापूर तालुक्यातील भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नवेरे, वेलवहाळ, डिंबा आणि खैरे. भिवंडी तालुक्यातील बोरशेती, एकसाल, चिंचवली, कुंडे, रावडी, अकलोली, वज्रेश्वरी, महाळूंगे आणि गणेशपुरी, वाडा तालुक्यातील निभावली, मेट, गोरांड, वसई तालुक्यातील खानिवडे, घाटेघर, शिरवली, अदने, पारोल, अंबोडे, भटाणे, साईवान, काशीद कोरगाव, कोपरगाव, हेडावडे, चिमणे या गाव, वाड्या, पाड्यातील रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. प्रशासन सर्व प्रकारच्या सुरक्षित उपाययोजनांसाठी सज्ज असून प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे जनतेने पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.
तानसा भरुन वाहू लागल्याचा व्हिडीओ –
⛈️ Tansa Lake, one of the lake supplying water to the Mumbai, has started overflowing at around 4:16 PM today. Three gates of the Tansa Dam have been opened, releasing water at a rate of 3,315 cusecs. The full storage capacity of Tansa Lake is 14,508 crore liters.#MumbaiRains… pic.twitter.com/AEmT4g8bEp
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 24, 2024
लोकल सेवा ढेपाळल्याने स्थानकांवर प्रचंड गर्दी
मुंबईत रविवारी मुसळधार पाऊस झाल्याने आठवड्याच्या पहिला दिवस सोमवारी मुंबईकरांना लोकल गाड्यांच्या विलंबाचा प्रचंड फटका बसला. सकाळी पिकअवरला पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबईकरांची त्रेधातिरपीठ उडाली. पावसाने दृश्यमानता कमी झाल्याने लोकल सेवा ढेपाळली होती. सायंकाळी देखील पावसाने मध्य रेल्वेच्या लोकल अर्ध्या तास उशीराने धावत होत्या. त्यामुळे कामावरुन घरी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.