Teera Kamat : राज्या पाठोपाठ केंद्राचंही सकारात्मक पाऊल, तीराच्या औषधावरील सर्व कर माफ
दुर्धर आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्या तीराच्या आई-वडिलांना राज्य सरकार पाठोपाठ आता केंद्र सरकारनंही मोठा दिलासा दिला आहे.
मुंबई : स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्या तीराच्या आई-वडिलांना राज्य सरकार पाठोपाठ आता केंद्र सरकारनंही मोठा दिलासा दिला आहे. तीरा कामत या 5 महिन्याच्या चिमुकलीसाठी औषध आयात करण्यास केंद्र सरकारकडून सीमा शुल्क माफ करण्यात आले आहे. केंद्र सरकारनं हे सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे कामत कुटुबियांना सीमा शुल्कासाठी लागणाऱ्या जवळपास साडे सहा कोटी रुपयांची कर माफी मिळणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. त्यामुळे फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.(Central government waives tax on Tira Kamat drugs suffering from SMA)
तीराच्या पालकांनी सीमा शुल्कातून सूट मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे या औषधावरील सर्व कर माफ करण्यासाठी फडणवीस यांनी 1 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं आणि सीमा शुल्क माफ करण्याची विनंती केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्देश देताच तातडीनं त्यावर कार्यवाही झाली आहे. त्यानुसार 9 फेब्रुवारीला या औषधावरील सर्व कर माफ करण्याचा आदेश वित्त विभागानं जारी केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी अतिशय संवेदनशीलतेनं पुढाकार घेत त्वरेनं कारवाई केल्यामुळे निश्चितपणे तीराचे प्राण वाचतील, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे. तसंच तीराला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.
Sincere gratitude to Hon PM @narendramodi ji for your humanitarian and extremely sensitive approach towards exempting all the taxes (approx ₹6.5 crore) for importing the life saving drug for Mumbai’s 5 month old Teera Kamat! I wish Teera a speedy recovery & healthy life! pic.twitter.com/wxT8PsnSx5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 9, 2021
राज्य सरकारकडूनही कर माफ
दुर्धर आजाराने ग्रासलेल्या तीराच्या आई-वडिलांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. SMA आजारावर लागणारे इंजेक्शन अमेरिकेतून भारतात मागवण्यासाठी जे सीमा शुल्क अर्थात कस्टम ड्यूटी भरावी लागणार होती. ती माफ व्हावी यासाठी राज्याच्या आरोग्य विभागानं कामत कुटुंबियांना एक पत्र दिलं आहे. असं असलं तरी हे औषध भारतात येण्यासाठी अजून 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं उचललेलं हे पाऊल नक्कीच सकारात्मक आहे.
5 महिन्यांच्या चिमुकल्या तीरावर सध्या तिच्या अंधेरीतील घरी पोर्टेबल व्हेंटिलेटरवर उपचार सुरु आहेत. तीराची प्रकृती स्थित असल्याची माहिती तिच्या कुंटुंबियांनी दिली आहे. दरम्यान, चिमुकलीच्या रक्ताचा एक अहवाल येणं अद्याप बाकी आहे. तो अहवाल पुढील 2 – 3 दिवसांत आल्यानंतर तीराला औषध मिळणं शक्य होणार आहे.
काय आहे स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी?
स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी या आजाराला मेडिकल टर्ममध्ये SMA म्हणतात. हा आजार एकप्रकारे जेनेटिक डिसिज अर्थात जनुकीय बदलांमुळे होणारा आजार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या आजारात शरीरातील स्नायू कमकुवत होतात. सुरुवातीला हात, पाय आणि पुढे फुफ्फुसांच्या स्नायुंची शक्ती कमी होत जाते. त्याचबरोबर चेहरा आणि मानेच्या स्नायुंचं काम कमी होऊन गिळताना अडचण निर्माण होते. त्यामुळे रुग्णाला हालचाल करणंही कठीण बनतं. रुग्ण एकप्रकारे रेस्पिरेटरी पॅरलेलिससमध्ये जातो. हा आजार दिवसेंदिवस वाढत जातो.
संबंधित बातम्या :
Teera Kamat : कामत कुटुंबियांना मोठा दिलासा, तीराच्या औषधांच्या करमाफीबाबत राज्य सरकारचं पत्र
Central government waives tax on Tira Kamat drugs suffering from SMA