Shiv Sena : शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी आदित्य ठाकरे, तर युवासेनेची धुरा तेजस ठाकरेंकडे? शिवसेनेत मोठे फेरबदल होणार?
तेजस ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आहेत. ते वन्यजीव संवर्धनासाठी काम करतात. राजकारणात ते अद्याप सक्रिय नाही.
मुंबई : राजकारणात आणखी एका ठाकरेंची एंट्री होणार आहे. शिंदे गटावर शिवसेनेच्या (Shivsena) धनुष्यातून “तेजस बाण” सोडण्याची तयारी सुरू झाली आहे. 15 ऑगस्टला षण्मुखानंद हॉलमध्ये कुटुंबीयांच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा होणार आहे. युवा सेनेची धुरा ही तेजस ठाकरेंकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंचीही शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे. शिवसेनेची ग्राऊंडवर पकड मजबूत करण्यासाठी आणि बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) स्वभावाशी समरस असलेल्या तेजस ठाकरे यांना मैदानात उतरवल्यास सेनेत नवे स्फुरण, नवे चैतन्य संचारेल, शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढेल, अशी चर्चा तसेच मत युवा सैनिकांनी व्यक्त केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वाइल्ड लाइफमधून राजकारणात तेजस ठाकरे येतील का, याची उत्सुकता आहे.
‘तेजस ठाकरेंचे क्षेत्र राजकारण नाही’
तेजस ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आहेत. ते वन्यजीव संवर्धनासाठी काम करतात. राजकारणात ते अद्याप सक्रिय नाही. मात्र चळवळीच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. तेजस ठाकरेंचे क्षेत्र राजकारण नाही, चळवळ म्हणून त्यांनी आपले काम केले आहे, असे मत नुकतेच शिवसेना नेते सचिन अहिर यांनी व्यक्त केले होते.
वाइल्ड लाइफ आणि काम
सात ऑगस्टला तेजस ठाकरे यांचा वाढदिवस आहे. क्रिकेट विव्हियन रिचर्ड्स यांच्याशी त्यांची तुलना सामनातून करण्यात आली. त्यांचे आयुष्य हे सिमेंटच्या इमारतीपासून आणि मुंबईच्या गजबजाटापासून कितीतरी दूर आहे. वाइल्ड लाइफ हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांनी खेकड्याच्या नव्या प्रजाती शोधल्या. त्यातील एकाला तर ठाकरेंचे नावही देण्यात आले आहे. गॅटिएना पत्रोपर्परिया, गॅटिएना स्पेंडिटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि गुबरमॅतोरिएना थॅकरी अशी या प्रजातींची नावे आहेत.
पाली आणि सापाच्या प्रजातीचाही शोध
खेकड्यांसोबतच पालींच्या प्रजातीचाही त्यांनी शोध घेतला. 2014मध्ये या प्रजातींचा शोध घेण्यात आला. या दुर्मीळ पालीच्या प्रजातीचे नाव मॅग्निफिसंट डॉर्फ गेको असे या पालीचे नाव आहे. तर सापाच्या प्रजातीचाही त्यांनी शोध लावला. त्याचे नाव बोईगा ठाकरे असे आहे.