अखेर नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार, 50 पदाधिकारी अखेर शिंदे गटात; मुख्यमंत्र्यांचं नाशकात बळ वाढलं
विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे आज आणि उद्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वीच ठाकरे गटात मोठी फूट पडल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई: अखेर नाशिकमधील ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. नाशिकच्या ठाकरे गटातील 50 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदाधिकाऱ्यांना भगवे शेले देऊन त्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश दिला. या पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटाचं नाशिकमधील बळ वाढलं आहे.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्केही उपस्थित होते. यावेळी नाशिकमधील ठाकरे गटाच्या 50 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यात विभागप्रमुख, तालुका प्रमुखांचाही समावेश होता. यावेळी नांदेडमधील सरपंचांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.
नाशिकमधी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे गटाचं नाशिकमधील वर्चस्व वाढलं आहे. नाशिकमध्ये शिंदे गट प्रबळ झाला आहे. यापूर्वी नाशिकमधील दोन डझन नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे शिंदे गटाचं बळ वाढलं होतं.
विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे आज आणि उद्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वीच ठाकरे गटात मोठी फूट पडल्याने खळबळ उडाली आहे. ठाकरे गट नाशिकमध्ये कमकुवत होत असल्याची सध्या चर्चा आहे.
दरम्यान, हा पक्षप्रवेश दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यभरातून मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी सोबत येत आहेत. चांगली सुरुवात होत आहे. नाशिकमध्ये अजय बोरस्ते, भाऊ चौधरी आणि त्यांच्या टीमने परत धडाका सुरू केला आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काम सुरू केलं आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आपल्याला जो पाठिंबा मिळत आहे. त्याचं कारण लोकं आपल्या सरकारवर विश्वास दाखवत आहेत. आपण सर्वसामान्यांच्या मनातील सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची ही पोचपावती आहे.
आपल्या सरकारने सहा महिन्यात चांगले निर्णय घेतले आहेत. सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शिक्षकांपासून शेतकऱ्यांपर्यंतचे निर्णय घेतले आहेत. माताभगिनींच्या सन्मानाचे निर्णय घेतले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
आमचं सरकार हे सामान्यांना सोबत घेऊन जाणारं सरकार आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील लोक शिवसेनेत सामील होत आहेत. नाशिकमधील लोक टप्प्याटप्प्याने येत आहेत. त्यांनी आधीच ठरवलं होतं. ते येत राहतील. मी त्यांचं स्वागत करत राहील, असं शिंदे म्हणाले.