खासदार गेले, आमदार गेले, आता ठाकरे गटाच्या महिला आघाडीत मोठी फूट, महिला पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार
माजी उद्धव ठाकरे यांच्या नाशिकच्या मालेगावमधील सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. मालेगावच्या महाराजा सयाजी महाराज गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावर ठाकरे गटाचा गर्जना मेळावा पार पडणार आहे.
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे. पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचा विस्तार करण्यासाठी आणि इतर समाज घटकांनाही आपल्यासोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या महिला आघाडीत मोठी फूट पडली आहे. महिला आघाडीतील काही महिला पदाधिकारी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दुसरीकडे ठाकरे गटातील महिला आघाडीच्या पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा होणार आहे. ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या 15 ते 20 महिला पदाधिकारी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे खासदार संजय राऊत नाशिकमध्ये असताना ठाकरे गटाला धक्का देण्याची परंपरा कायम राहिली असल्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे.
राऊतांचा मालेगावात तळ
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नाशिकच्या मालेगावमधील सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. मालेगावच्या महाराजा सयाजी महाराज गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावर ठाकरे गटाचा गर्जना मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला लाखो लोक येणार असल्याचा दावा केला जात आहे. ही सभा यशस्वी व्हावी म्हणून खासदार संजय राऊत गेल्या तीन दिवसांपासून मालेगावात तळ ठोकून आहेत. सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. एक लाखापेक्षा अधिक लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
अली जनाब उद्धवजी ठाकरे… उर्दूत पोस्टर
या सभेच्या माध्यमातून मुस्लिम समुदायाला आपल्याकडे वळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मालेगावंमधील मुस्लिम नागरिकांना सभेच्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं आहे. मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी मालेगावच्या मुस्लिम बहुल भागात उर्दूमध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख अली जनाब उद्धवजी ठाकरे असा करण्यात आला आहे. तसेच संजय राऊत यांनी गेल्या तीन दिवसात अनेक मुस्लिम नेत्यांशी चर्चा केली आहे. शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष युसूफ भाई नॅशनलवाले यांच्या घरी राऊत यांनी भेट दिली आहे. या भेटीत सभेच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच भिवंडी आणि मालेगावमधील पॉवर लूम व्यवसायाबाबत राऊत यांनी मुस्लिम बांधवांशी चर्चा केली.