“गोविंदाला पक्षात घेताना भाजपला विचारलंय ना?, त्यांनीच गोविंदावर ‘दाऊदची मदत’ घेतल्याचा केलेला आरोप”
बॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आहुजा याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावरून ठाकरे गटाने भाजपने केलेल्या टीकेचा धागा पकडत शिंदे गटाला टोला लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीआधी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आहुजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. आज दुपारी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गोविंदाने शिंदे गटात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीमध्ये गोविंदाला स्टार प्रचारक म्हणून शिंदे यांनी जबाबदारी दिली आहे. या पक्षप्रवेशावरून ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपने केलेल्या टीकेचा धागा पकडत ठाकरे गटाकडून ट्विट करत शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
ज्या गोविंदावर भाजपने ‘दाऊदची मदत’ घेतल्याचे आरोप केले, त्या गोविंदाला पक्षात घेताना भाजपला नक्की विचारलंय ना?, असा खोचक सवाल ठाकरे गटाने विचारत मुख्यमंत्री शिंदेना डिवचलं आहे. भाजपने याआधी खरंच असा आरोप केला होता का? कोणी केला होता जाणून घ्या.
2004 साली उत्तर मुंबई मतदार संघातून भाजपचे राम नाईक आणि काँग्रेसकडून अभिनेता गोविंदा यांची लढत झाली होती. यामध्ये गोविंदाने विजया झाला होता. यानंतर माजी राज्यपाल राम नाईक यांनी त्यांच्या 2016 साली प्रकाशित झालेल्या चरैवेती चरैवेती या आत्मचरित्रात गोविंदाने मला हरवायला दाऊदची मदत घेतली होती असा दावा केला होता.
ज्या गोविंदावर भाजपने ‘दाऊदची मदत’ घेतल्याचे आरोप केले, त्या गोविंदाला पक्षात घेताना भाजपला नक्की विचारलंय ना? pic.twitter.com/ABsiNV1UoX
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 28, 2024
एकनाथ शिंदे आल्यापासून मुंबईत विकास- गोविंदा
एकनाथ शिंदे यांचं व्यक्तीमत्व मला आवडलं. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. फिल्मसिटी मॉर्डन आहेच. मुंबई आधीपेक्षा जास्त सुंदर दिसतेय. विकास दिसतोय. एकनाथ शिंदे आल्यापासून मुंबईत विकास दिसत असल्याचं गोविंदा पक्षप्रवेशावेळी म्हणाला.
मी राजकारणातून बाहेर पडल्यानंतर असं वाटलं नव्हतं की मी पुन्हा राजकारणात येईल. पण 14 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर मी जिथे आहे त्याच पक्षात एकनाथ शिंदे यांच्या कृपेने पुन्हा या पक्षात आलोय. मी सर्वांचे आभार मानतो. आपल्याकडून मला मिळालेली ही जबाबदारी मी प्रमाणिकपणे पार पाडेन. मी सेवा प्रदान करेन. मी कला आणि संस्कृतीसाठी काम करेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.