“ज्यांना स्वतः निवडून येता येत नाही, त्यांनी यावर बोलू नये”; ठाकरे गटाने नारायण राणेंना केलं लक्ष्य…
नारायण राणे यांना स्वतः निवडून येता येत नाही त्यांनी यावर बोलू नये अशी जोरदार टीका त्यांच्यावर करण्यात आली.
मुंबईः बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि शिंदे-फडणवीस सरकारने बाळासाहेब यांचे तैलचित्र लावल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंद गटाबरोबर भाजपलाही लक्ष्य करत त्यांनी राज्यासह केंद्रातील भाजप आता बदलली असल्याचा ठपका भास्करराव जाधव यांनी ठेवला आहे. भास्करराव जाधव आणि संजय पवार या ठाकरे गटाच्या नेत्यांमुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात आणि देशात असलेला भाजप पक्ष आता पूर्वीसारखा राहिला नाही. भाजप आता सत्तेनं उन्मत्त झालेली पक्ष असल्याची बोचरी टीका भास्करराव जाधव यांनी केली आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पंडीत नेहरुंचा फोटो लावलेला चालणार नाही अशा पद्धतीची आताची भाजप झाली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
अशा प्रकारचा भाजप पक्ष झाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात तसं नया भारत तसं ही नया भाजपा झाला आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
भाजपवर सडकून टीका करताना भास्करराव जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नारायण राणे हा राजकीय शक्तीपात झालेला माणूस आहे. त्यामुळे त्यांनी शक्तीविषयी बोलू नये.
निवडणुकीवरूनही त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली आहे. नारायण राणे यांना स्वतः निवडून येता येत नाही त्यांनी यावर बोलू नये अशी जोरदार टीका त्यांच्यावर करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रत्येकवेळी महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरवेळी नव्या नव्या महापुरुषांबद्दल बोलून त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचा करावा तेवढा उपमर्द केला आहे अशी जोरदार टीका भास्करराव जाधव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली.
नाना पटोले म्हणतात तेच खरं आहे कारण राजीनामा देण्याची इच्छा त्यांनी राष्ट्रपतींकडे करायला हवी होती, त्यानंतर त्यांचा राजीनामा नाट्यावर पडदा पडला असता असा टोलाही त्यांनी राज्यपालांना लगावला आहे.