ज्या ठाण्याने हिंदुहृदय सम्राटांना पहिला राजकीय विजय मिळवून दिला त्या शिवसेनेचं ठाणं आहे. त्या ठाण्याने उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत केलं आहे. अख्ख्या महाराष्ट्रात भगवा सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्ताने काम सुरू आहे. हा भगवा सप्ताह काल ठाण्यात व्हायला पाहिजे होता. काल नागपंचमी होते. ज्या सापांना या ठाण्यात इतकी वर्ष दूध पाजलं अगदी हिंदुहृदय सम्राट, धर्मवीर आनंद दिघे आणि उद्धव ठाकरे तुम्ही या सापांना दूध पाजलं त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच आलो असतो. लोकसभेत या सापांच्या शेपट्या वळवळत राहिल्या. विधानसभेत त्यांच्या शेपट्या ठेचल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
आपला भगवा सप्ताह आहे. त्यांचा आम्हाला जगवा सप्ताह आहे. दिल्लीत जातात मोदींना म्हणतात आम्हाला जगवा. सध्या ते सिनेमे फार काढत आहेत. ते मुख्यमंत्री आहेत की दिग्दर्शक. मलाही एक सिनेमा काढायाचा आहे. नमक हराम टू. माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे. एक नमक हराम आला होता. अमिताभ आणि राजेश खन्नाचा. मी चांगला लेखक आहे, हे तुम्हाला माहीत आहे. मी राजकारण घडवतो. बाळासाहेबांनी शिकवलं राजकारण घडवलं पाहिजे, बिघडवलं पाहिजे. तेव्हा मी नमक हराम सिनेमा काढणार आहे. या नमकहरामांची पोलखोल करणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
लाडक्या बहिणींची किंमत दीड हजार फक्त दीड हजार. आमदारांना दीड कोटी. जी लाडकी बहीण शिवसेनेसोबत राहिल तिच्या घरावर बुलडोझर. हा गुजरात पॅटर्न आहे. तो महाराष्ट्रात चालणार नाही. उद्धव ठाकरे यांचा दिल्लीचा दौरा अभिमान वाटावा असा झाला. देशाच्या राजधानीत जेव्हा उद्धव ठाकरे यांचं आगमन झालं. तेव्हा अहमद शाह अब्दाली घाबरून घरात बसला होता. कुणी बाहेर आलं नसल्याचं म्हणत राऊतांनी टीका केली.
मोदी आणि शाह यांच्या १०० पिढ्या आल्या तरी बाळासाहेबांचं राज्यावरील ऋण पुसता येणार नाही. तुम्ही कितीही मिंधे निर्माण करा. हे मिंधे येतील आणि जातील. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. औरंगजेब गुजरातमध्ये जन्मला. आमचा तो आदर्श नाही. आमचा शिवाजी महाराज हा आदर्श आहे. पुढील दोन महिन्याची लढाई महत्त्वाची आहे. ही लढाई जिंकलो तर आपणलं पुढचे २५ वर्ष राज्यात सत्ता राहिल, असं राऊत यांनी सांगितलं.