ठाणे : मुंबईतील बोरीवलीत बांगलादेशी घुसखोरांच्या शोधात धडक मोहीम हाती घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठाण्यात बांगलादेशी कुटुंब पकडल्याचा (Thane MNS Bangladeshi) दावा केला आहे. विशेष म्हणजे महिलांकडे आधार-पॅनसारखी अधिकृत ओळखपत्रं सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ठाण्यातील पातली पाडा परिसरातील किंगकाँगनगरमध्ये मनसेने काही बांगलादेशी कुटुंब पकडल्याचा दावा केला आहे. त्यापैकी एक महिला आपल्या पतीशिवाय मुलांना घेऊन राहते. पती काही वर्षांपूर्वी आपल्याला मुंबईत सोडून बांगलादेशला निघून गेल्याचं तिने सांगितलं.
दुसऱ्या कुटुंबातील महिला लग्न करुन भारतात आली आहे, तिलाही दोन मुलं आहेत. धक्कादायक म्हणजे दोन्ही महिलांकडे आधारकार्ड, पॅन कार्ड इतकंच काय, तर व्होटिंग कार्डही आहे. कुठलीही कागदपत्र नसताना ओळखपत्र मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे ते भारतीय असल्याचा पूर्ण पुरावा त्यांच्याकडे आहे.
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि इतर कार्यकर्त्यांनी धाड टाकून या बांगलादेशींना पकडलं. याच विभागात आणखी 50 कुटुंबं असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ही कुटुंबं आजूबाजूच्या घरात धुणी भांडी करुन, बिल्डिंगच्या साईटवर काम करुन आपला उदरनिर्वाह करतात, अशी माहिती आहे.
विरार-बोरीवलीनंतर ठाण्यात धाड
बोरीवली पूर्व चिकूवाडी परिसरात बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेने काल सकाळी आंदोलन केलं होतं. या भागात अनेक दिवसांपासून काही बांगलादेशी महिला आणि पुरुष राहत असल्याचा स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांचा दावा होता. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चिकूवाडीतील झोपडपट्टी परिसरात शोध मोहीम राबवत लोकांची चौकशी केली. त्यांची कागदपत्रंही तपासली. त्यांचा पेहराव आणि बोलीभाषा बांगलादेशींसारखी असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
आंदोलनादरम्यान स्थानिक बोरीवली पोलीस ठाण्याचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले होते. त्या वस्तीत राहणाऱ्या लोकांकडे आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र आढळलं. पण, त्यांची मजूर म्हणून स्थानिक पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद नाही. तर कामाच्या शोधात कोलकाता, ओदिशामधून मुंबईत आल्याचा इथल्या लोकांचा दावा आहे. मोलमजुरी करुन दिवसाकाठी त्यांना 350 ते 400 रुपये मजुरी मिळते. पोलिसांना यात काही बालमजूरही आढळले.
Thane MNS Bangladeshi