मुंबईकरांनो सावधान! रेल्वे स्थानकावर चहा घेण्याआधी हा व्हिडीओ नक्की पाहा…
ठाणे रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थाच्या स्टॉलवरील एक व्यक्ती चक्क कचरापेटीत चहाचे ग्लास धुताना आढळला आहे
मुंबई : काहीच महिन्यांपूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकातील फलाटावरील खाद्यपदार्थ स्टॉलच्या छतावर एक व्यक्ती घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता (Kurla Dirty Lemon Juice). त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच एक गलिच्छ प्रकार समोर आला आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थाच्या स्टॉलवरील एक व्यक्ती चक्क कचरापेटीत चहाचे ग्लास धुताना आढळला आहे (Thane Dirty Tea). रेल्वे स्थानकावरील एका जागरुक प्रवाशाने या संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ बनवला. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे (Thane Dirty Tea).
ठाणे रेल्वे स्थानकाच्या एका फलाटावर खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर काम करणारा एक व्यक्ती रेल्वे स्थानकावरील कचऱ्याच्या पेटीत चहाचे कप धुताना आढळून आला. ही व्यक्ती रेल्वे स्थानकावर सुक्या कचऱ्यासाठी ठेवलेल्या कचरापेटीत चहाचे ग्लास धुताना दिसत आहे. एका जागरूक प्रवाशानं त्याच्या मोबाईलमध्ये हा रेल्वे स्थानकावरील हा घाणेरडा प्रकार टिपला. या व्हिडीओत ती व्यक्ती चहाचे ग्लास धुत असलेल्या डब्यातच आपलं बनियानही धुताना दिसत आहे.
या प्रकारानंतर ठाणे रेल्वे स्थानक प्रशासनाने कारवाई करत या स्टॉलवरील चार जणांना काढून टाकलं आहे. तसेच, त्यांच्यावर एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे मनसेनेही आक्रमक भूमिका घेत रेल्वे स्थानकावरील सर्व स्टॉल धारकांना सज्जड दम दिला आहे. तसेच, या घृणास्पद प्रकार ज्या स्टॉलवर झाला त्याच्या ठेकेदाराचं लायसन्स रद्द करण्यात यावी अशी मागणीही मनसेकडून करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. 7 वरील एका खाद्यपदार्थांच्या स्टॉलच्या छतावर एक व्यक्ती घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर रेल्वेकडून या प्रकरणाची तातडीने दखल घेण्यात आली आणि त्या स्टॉलधारकावर कारवाईही करण्यात आली. मात्र, त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाण्यात अशाच प्रकारचा गलिच्छपणा समोर आल्याने रेल्वे स्थानकावरील स्टॉलधारक प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा आरोप केला जात आहे.
रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या आशा स्टॉलवर रेल्वे प्रशासन काही कठोर कारवाई करणार का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
पाहा व्हिडीओ :