मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावर बांधला जातोय सर्वात मोठा बोगदा, मुंबईकरांची इतकी मिनिटे वाचवणार
मुंबई शहर वाहतूक प्रकल्प - 3 अंतर्गत कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल असा पर्यायी मार्ग वेगाने तयार होत आहे. त्यामुळे मुंबईकरांची 30 मिनिटे वाचणार आहेत.

मुंबई : मुंबईकरांच्या प्रवासाचा अर्धा तास वाचविणारा बोगदा कर्जत ते पनवेल या नव्या मार्गिकेवर बांधला जात आहे. या मार्गावर 2.6 किमीचा बोगदा खणण्याच्या कामाला सुरूवात डोंगरात ब्लास्ट घडवून बुधवारी करण्यात आली आहे. पनवेल आणि कर्जत ( PANVEL-KARJAT ) दरम्यान नवा उपनगरीय मार्ग बांधला जात आहे. 29.6 किलोमीटरच्या मार्गामुळे कर्जतवरून सीएसएमटीला ( CSMT ) व्हाया पनवेल पोहचता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाची 30 मिनिटे वाचणार आहेत.
मुंबई शहर वाहतूक प्रकल्प – 3 अंतर्गत कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल असा पर्यायी मार्ग वेगाने तयार होत आहे. पनवेल ते कर्जत या एकूण 29.6 कि.मी.च्या रेल्वे मार्गिकेमुळे मुंबईकराच्या प्रवासाच्या वेळेत घसघशीत बचत होणार आहे. सध्या कर्जत ते सीएसएमटीला धिम्या लोकलने येण्यासाठी २ तास १९ मिनिटे लागतात. हा मार्ग कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल असा जोडला गेल्याने हा लोकल प्रवास 1 तास 50 मिनिटांचा होणार आहे. या प्रकल्पासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला 2,782 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या मार्गाचे अर्थ वर्कची (जमिनीवरचे काम ) कामे, तसेचे छोटे ब्रिज, रेल्वे फ्लायओव्हर, उड्डाण पुल, रोड अंडर ब्रिजची कंत्राटे देऊन वेगवेगळ्या टप्प्यावर कामे सुरू असल्याची माहीती मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे प्रवक्ते सुनील उदासी यांनी दिली आहे.
डिसेंबर 2025 पर्यंतची डेडलाईन
हा नवा मार्ग सध्याच्या मालगाडीच्या मार्गाशेजारी बांधला जात आहे. या मार्गावर तीन मोठे बोगदे बांधले जात आहेत. तर दोन रेल्वे उड्डाण पुल, 44 मेजर आणि मायनर ब्रिज, 15 रोड अंडर ब्रिज आणि सात रोड ओव्हर ब्रिज बांधले जाणार आहे. डिसेंबर 2025 पर्यंत हा मार्ग बांधण्याची डेडलाईन आहे. या मार्गावर वावरले हील परीसरात २.६ किमीचा बोगदा बांधला जात असून नढाल हील जवळ 219 मीटर आणि किरवली हील जवळ 300 मीटरचा बोगदा खणला जात आहे. असे तीन बोगदे येथे खणले जात आहेत. आतापर्यंत मुंबई उपनगरीय मार्गावरील पहीला मोठा बोगदा ठाणे ते दिवा मार्गिकेवर ( 1.3 किमी ) बांधण्यात आला आहे. त्यानंतरचा मोठा बोगदा आता पनवेल ते कर्जत मार्गावर बांधला जात आहे.
असा बांधला जात आहे मार्ग सध्या पनवेल आणि कर्जत यांना जोडणारा मार्ग एकेरी असून तो पनवेल, खालापूर आणि कर्जत तालुक्यातून जातो. काही मालगाड्या तसेच लांबपल्ल्याच्या गाड्या त्यावरून धावतात. हा मार्ग दुपदरी करण्यात येत आहे. नवा प्रस्तावित पनवेल -कर्जत मार्ग सध्याच्या मार्गाला जवळपास समांतर बांधण्यात येत आहे. सध्याच्या मार्गावर दोन बोगदे आहेत. नव्या मार्गावर तीन बोगदे बांधण्यात येणार आहेत.