जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया नेमकी काय?
जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत. लोकप्रतिनिधी आहेत. काल आम्ही एकत्र कार्यक्रमाला होतो.
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. याचे पडसात राज्याच्या राजकारणात उमटतात. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला की, नाही याची माहिती मला नाही. परंतु, महिलेनं गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नियमानुसार गुन्ह्याची चौकशी करतील. तपास करतील. पडताळणी करतील. तत्थ्य असेल नसेल त्याची पडताळणी करतील. त्यामध्ये आमचं सरकार कोणतही राजकीय हस्तक्षेप करणार नाही. सूडभावनेनं कारवाई केलेली नाही आणि करणारही नाही, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
हे कायद्याचं राज्य आहे. नियमानुसार राज्य चालतं. पण, कायदा हातात घेणं हे कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतलं जाणार नाही. कुठलीही कारवाई सूडभावनेपोटी केली जाणार नाही. एफआयआर दाखल झाला आहे. पोलीस तपास करतील. त्यानुसार पोलीस योग्य तो निर्णय घेतील.
खुनाचं षडयंत्र रचलं असं काही नाही. जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत. लोकप्रतिनिधी आहेत. काल आम्ही एकत्र कार्यक्रमाला होतो. त्यामुळं यामध्ये पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. पोलीस योग्य तो तपास करून कारवाई करतील, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात आपली भूमिका मांडली. मी माझ्या वडिलांचं नाव व पक्षाचं चिन्ह का वापरू शकत नाही, असं आपलं म्हणणं मांडलं. यावर ती बाब न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळं त्यावर बोलणं योग्य होणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.