काँग्रेस शिष्टमंडळ तातडीने राजभवनावर, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात काय केला गंभीर आरोप
Congress Delegation : काँग्रेस शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात हिंसक वक्तव्य करणाऱ्यांना अटक करा. विदर्भ आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने केली आहे.
काँग्रेस शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेतली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राज्यात राजकीय व सामाजिक अस्थिरता आहे. विदर्भ आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण अद्याप मदत मिळाली नाही. शेतकरी वर्गात मोठा संताप आहे असे राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी काँग्रेस शिष्टमंडळाने त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
तक्रारींचा वाचला पाढा
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. अजून या सबंधित लोकांवर कारवाई झालेली नाही. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात सत्ताधारी आमदारांनी आणि खासदारांनी हिंसक विधानं केली. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या जीवाला धोका असल्याचे निवेदनात म्हटले आहे. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षाताई गायकवाड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. चंद्रकांत हंडोरे, विशाल पाटील, आ. अस्लम शेख, अमीन पटेल, नितीन राऊत, विश्वजित कदम, आरिफ नसीम खान, विक्रम सावंत, सचिन सावंत यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांची बघ्याची भूमिका
लोकशाहीत विरोध करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण हिंसक भाषेचा वापर होत असताना मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आ. संजय गायकवाड आणि खा. अनिल बोंडे यांना तात्काळ अटक करण्यात आल्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे. राज्यात दंगली घडवण्याचा सत्ताधारी पक्षांचा कट तर नाही ना? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचे सहा लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. अजूनही याचे पंचनामे झालेले नाहीत. केंद्रीय कृषी मंत्री यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याचा दौरे करून मदत जाहीर केली पण महाराष्ट्रात मात्र अजूनही केंद्रीय कृषी मंत्री किंवा केंद्रीय पथक पाहणी करण्यास आले नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. गुन्ह्यात आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. स्पर्धा परीक्षा रखडल्या आहेत. उमेदवारांना सरकारकडून नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. युवा पिढी बेरोजगारीमुळे नैराश्याच्या गर्तेत जात आहे, असल्याचा आरोप करण्यात आला.