BMC : मुंबई महापालिका खड्डेही मोजते बरं..! गतवर्षीच्या तुलनेत 3 हजाराने घटली खड्ड्यांची संख्या, ‘बीएमसी’ चा दावा
रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरित बुजविण्याचे काम महानगरपालिकेतर्फे केले जाते. खड्ड्यांबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी संकेतस्थळ, मोबाईल ॲप, समाज माध्यमं, टोल फ्री दूरध्वनी क्रमांक असे विविध पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. शिवाय याचाही उपयोग खड्डे बुजवण्यासाठी झाला आहे.
मुंबई : आता तुम्हाला खरे वाटणार नाही पण गतवर्षीच्या तुलनेत (BMC) मुंबई महापालिका हद्दीत गतवर्षीच्या तुलनेत 3 हजार खड्डे कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मान्सूनपूर्व कामात (Potholes on the road) रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले होते. त्यामुळे ही संख्या घटली आहे. यासाठी 1 एप्रिल ते 7 जुलै दरम्यान (Municipal corporation) महानगरपालिकेने 7 हजार 211 खड्डे बुजवले आहेत. खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी त्याचप्रमाणे रस्ते देखभाल करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने पथक आणि कंत्राटदार नेमण्यासह विविध उपाययोजना केल्या आहेत. गतवर्षी याच कालावधीत महानगरपालिकेने सुमारे 10 हजार 199 खड्डे बुजवले होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत खड्ड्यांची संख्या घटली असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रभावी उपाययोजनांमुळे खड्डेमुक्त रस्ते
रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरित बुजविण्याचे काम महानगरपालिकेतर्फे केले जाते. खड्ड्यांबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी संकेतस्थळ, मोबाईल ॲप, समाज माध्यमं, टोल फ्री दूरध्वनी क्रमांक असे विविध पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. शिवाय याचाही उपयोग खड्डे बुजवण्यासाठी झाला आहे. पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे, ही नित्य प्रक्रिया आहे. ही बाब लक्षात घेता, रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने दरवर्षी विविध उपाययोजना करण्यात येतात. यंदाही अशा उपाययोजना केल्या आहेत.
तक्रार प्राप्त होताच घेतली जाते दखल
महानगरपालिकेच्या वरळी स्थित अस्फाल्ट प्लांट येथे निर्मित कोल्ड मिक्स महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांना त्यांनी नोंदवलेल्या मागणीप्रमाणे नियमितपणे पुरवण्यात येतो. आतापर्यंत 24 प्रशासकीय विभागांना मिळून सुमारे 2 हजार 422 मेट्रिक टन ड्राय कोल्ड मिक्स पुरवण्यात आले आहे. महानगरपालिकेने कंत्राटदार नियुक्त केलेले आहेत. हे कंत्राट द्विवार्षिक स्वरुपाचे आहेत. संबंधित कंत्राटदारांकडून त्यांना नेमून दिलेल्या रस्त्यावरील खड्डे तातडीने भरले जातील, यासाठी देखील महानगरपालिकेने नेमलेली पथके लक्ष ठेवून आहेत.
सिमेंटच्या रस्त्यावर महापालिकेचा भर
खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी मुंबई महानगरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिवर्षी खड्ड्यांची संख्या आणि समस्या हळूहळू कमी होत आहे. मागील 5 वर्षात 608 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत मुंबईतील सुमारे 800 किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचे झाले आहेत. यापुढे 6 मीटर रुंदीचे रस्तेसुद्धा टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महानगरपालिकेने स्वीकारले आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रिटीकरणाचे जाळे वाढवून खड्डेमुक्त मुंबई हेच धोरण राहणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.
महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन
*आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक: 1916
* सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्र (CFC)
* टोल फ्री दूरध्वनी क्रमांक: १८००२२१२९३
* ट्विटर: @mybmcroads
* बीएमसी व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक: 91-8999-22-8999