Eknath Shinde: एकनाथ शिंदे गटाला केंद्र सरकारमध्ये दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता, शिंदे गटातील या दोन खासदारांची नावे चर्चेत
एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला केंद्र सरकारमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकांनंतर एक मंत्रीपद देण्यात आले होते. शिवसेनेनं राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर, ते मंत्रीपद सोडण्यात आले होते.
मुंबई- एकनाथ शिंदे गट (CM Eknath Shinde)आणि भाजपा यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार, राज्यात आणि केंद्रातही एकनाथ शिंदे गटाला सत्तेत संधी मिळणार आहे. एकनाथ शिंदे गटाला केंद्रात 12शिवसेना खासदारांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यातील दोन खासदारांना केंद्रात मंत्रिपदे (Central ministry)मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या वाट्याला एक केंद्रीय मंत्रिपद तर एक राज्यमंत्री पद येण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून खासदारांचा 12 जणांचा गट बाहेर पडल्यानंतर, शिवसेा ही एनडीएचाच घटक पक्ष असल्याचा दावा या गटाकडून करण्यात आला होता. तसेच याबाबतचे पत्रही लोकसभा अध्यक्षांना देण्यात आले होते. सध्या शिंदे गटाचे शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे (Rahul Shewale)हे आहेत. तर प्रतोद भावना गवळी या आहेत. आता या 12 जणांपैकी दोन खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशी चर्चा आहे.
कोणत्या खासदारांना मिळेल मंत्रिपद
दक्षिण मध्य मुंबईचे खासदार आणि एकनाथ शिंदे गटाला पहिल्यांदा पाठिंबा जाहीर करणारे खासदार राहुल शेवाळे यांना यातील एक मंत्रिपद मिळेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर विदर्भातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनाही केंद्रात मंत्रिपद दिले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही काळात अपेक्षित असून त्यात या दोन जणांचा समावेश करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.
शिंदे गटाकडून मंत्रिमंडळ विस्तारात मुंबई, विदर्भाची कमी नावे
राज्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाकडून मंगलप्रभात लोढा वगळता एकाही मंत्र्याचा समावेश झालेला नाही. अशा स्थितीत मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाकडून मुंबईला प्रतिनिधीत्व दिले नाही, असा संदेश गेला आहे. त्यामुळे राहुल शेवाळे यांना केंद्रात संधी देत हा आक्षेप कमी केला जाऊ शकतो. तसेच विदर्भातही शिंदे गटाच्या एकाही आमदारा मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही, त्यामुळे प्रतापराव जाधव यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात येईल. प्रादेशिक समतोल साधण्यासाठी ही पावले लवकरच उचलली जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेला केंद्रात होते एक मंत्रीपद
एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला केंद्र सरकारमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकांनंतर एक मंत्रीपद देण्यात आले होते. शिवसेनेनं राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर, ते मंत्रीपद सोडण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री असलेले अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर राजीनामा दिला होता.
शिंदे गटात शिवसेनेचे कोणते खासदार
हेमंत गोडसे – शिवसेना राजेंद्र गावित – पालघर धैर्यशील माने – हातकणंगले संजय मंडलिक – कोल्हापूर सदाशीव लोखंडे – शिर्डी भावना गवळी- यवतमाळ-वाशिम राहुल शेवाळे – मुंबई दक्षिण मध्य श्रीरंग बारणे – मावळ श्रीकांत शिंदे – कल्याण प्रतापराव जाधव – बुलढाणा कृपाल तुमाने – रामटेक हेमंत पाटील – हिंगोली