Abdul Sattar: बंडाची कहाणी अब्दुल सत्तार यांच्या जुबानी, नाकाबंदी ते दोन आमदारांचं पलायन, काय काय घडलं?
सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनीही हा सगळा घटनाक्रम असाच उलगडून सांगितला आहे. नेमकं काय घडलं, कसे निघालो, नाकाबंदी कशी होती, दोन आमदार कसे परतले, हे सगळे त्यांनी उलगडून त्यांच्या भाषेत सांगितले आहे. ऐकूयात ही बंडाची कहाणी अब्दुल सत्तार यांच्या जुबानीतून.
औरंगाबाद – एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला असला तरी त्यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर केलेल्या दीर्घ बंडाची आठवण अजूनही राज्यातील नागरिकांच्या मनात आहे. हे सगळे शिवसेनेचे मंत्री, आमदार राज्यातून गुजरातला (Gujrat)कसे गेले, त्यांना वाटेत कशाकशाचा सामना करावा लागला, याच्याकाही बाबी आता हळूहळू समोर येत आहेत. शिवसेनेच्या दोन आमदारांनी बंडातून माघार घेतली. त्या आमदारांनी मुंबईत आल्यावर आपल्याला धमक्या देण्यात आल्या, मारहाण करण्यात आली, असे पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र प्रत्यक्षातकाय घडले हे त्या बंडात सहभागी असलेल्या आमदारांनाच चांगले माहित होते. आता सत्तास्थापनेनंतर बंडखोर आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात परततायेत. त्या ठिकाणी ते बंडाचा पूर्ण घटनाक्रम सांगत आहेत. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar)यांनीही हा सगळा घटनाक्रम असाच उलगडून सांगितला आहे. नेमकं काय घडलं, कसे निघालो, नाकाबंदी कशी होती, दोन आमदार कसे परतले, हे सगळे त्यांनी उलगडून त्यांच्या भाषेत सांगितले आहे. ऐकूयात ही बंडाची कहाणी अब्दुल सत्तार यांच्या जुबानीतून.
विधान परिषद मतदानानंतर काय झालं ?
अब्दुल सत्तार म्हणतात, मतदान झाल्यानंतर, एकनाथ शिंदे नाराज दिसले. नाराज झाल्यावर त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ते ज्या भाषेत बोलले, त्या दिवसाची जी परिस्थिती होती. त्यांनी सांगितली. अनिल देसाई यांच्यासोबत शिवसेनेच तीन नेते आत बसले आणि एकनाथ शिंदे आमदारांसोबत बाहेर बसले. त्यावेळी ते नाराज दिसत होते. निर्णय लागण्य़ापूर्वी आमचा निर्णय लागून गेला.
प्रासंगिक करार संपल्याचे अजितदादांकडे संकेत
त्या वेळी आपण खरे तर अजित पवारांसोबत बसलो होतो. तिथे अजितदादा, जयंत पाटील राष्ट्रवादीचे सात ते आठ नेते होते. सुमारे दीड ते दोन तास बसलो होतो. मी त्यांना सांगितलं की प्रासंगिक करार संपू लागला.त्याच्याकडे त्यांनी काही फारसं लक्ष दिलं नाही. हे जयंत पाटील यांना थोडसं समजलं, ते म्हणाले तिकडा प्रासंगिक करार संपला असेल तर आमच्याकडे या. सहज हसता हसता ते म्हणाले. मी त्यावर म्हटलं की हो त्याच्यावरही विचार करु. हे सर्व होत असताना मी त्यांच्यासोबत दोन तास बसलो. दादांना वाटलं की मी त्यांना बिझी ठेवलं, पण तसं काही नव्हतं. आमचं काही ठरलेलं नव्हतं.
मुख्यमंत्र्यांचा आला होता फोन
शिंदे साहेब आणि मित्रपरिवार निघाला, त्यावेळी कुणाला काहीच समजायला तयार नाही. पहिल्यांदा सांगितलं की आपल्याला ठाण्यामध्ये बसायचं आहे. चर्चा करायची आहे. त्यानंतर सांगितलं की हॉटेलमध्ये जायचंय, तिथं चर्चा करायची आहे. असं चालत चालत जाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आला. त्यांनी विचारलं की कुठे चाललात. मी सांगितलं की मोटे नावाचा एक जि. प. सदस्य आहे. बाभऱ्याचा त्यांच्या कार्यकमाला वसई विरारला चाललो. त्या परिस्थितीनुसार ते म्हमाले की बघा काहीतरी गडबड आहे, मी म्हणालो की काही गडबड नाही, आमची गाडी सरळ चालू आहे. मध्ये एका धाब्यावर आम्ही थांबलो, तिथे चार पाच गाड्या आल्या. नंतर एकनाथ शिंदे यांच्या कॉनव्हॉय तिथे आला. चहा पाणी, गप्पा झाल्या. तिथे फोनाफोनी झाली. वार्यासारखी बातमी पसरली. तिकडे निकालही लागला नव्हता. पाच सव्वा पाचला आम्ही निघालो. कशी तोडली नाकाबंदी?
इतके आमदार चालले तर काही नाकाबंदी करण्याचा आदेश वरुन आला. नाकाबंदी करण्यासाठी पोलीस सज्ज झाले. आपल्या सीमेवर. एकनाथ शिंदे हेही मंत्री, राजकारणी आहे. त्यांनी पर्याय शोधला. ते म्हणाले आम्हाला नाकाबंदी कसे करु शकता, आम्ही काय चोर आहोत का, स्मगलर आहोत का, अशी विचारणा शिंदेंनी पोलिसांना केली. आम्ही मंत्री, आमदार आहोत आम्ही कुठेही जाऊ शकतो. असे त्यांनी पोलिसांना सांगितले. कुणीही आम्हाला असं अडवू शकत नाही. मग पोलीस मागे सरकले आणि पर्यायी एक लाईन पोलिसांनी उघडली, एक लाईन क्लिअर केली. तिथे वाहतूक कोंडी होती. गुजरात हायवेला नेहमीच गर्दी असते. इकडून तिकडून काढून आम्ही गाड्या पुढे नेल्या. गुजराती पाट्या पाहिल्यावर कळलं की गुजरातमध्ये आलो म्हणून. तोपर्यंत आम्हालाही माहित न्वहतं की गुजरातला जायचंय म्हणून. जाममधून आम मिळाला खायला. एकनाथ शिंदेंनी त्यांचे सोर्स वापरले. शिंदे साहेब हे काही छोटे नेते नाहीत. ठाण्यापासून त्यांना मानणारे कार्यकर्ते, अधिकारी आहेत. त्यांच्या संबंधांतून त्यांनी पुढचा मार्ग काढला. एक लाईन क्लिअर करण्याचा त्यांनी एक फोन कुठल्यातरी अधिकाऱ्याला लावला.
कैलास पाटील कसे परतले
मेन लाईन क्लिअर करण्याचं त्यांनी सांगितलं, लाईन बदलून दुसऱ्या लाईनवर येण्यासाठी सात आठ मिनिटांचा वेळ लागला. त्यात कैलास पाटील लघुशंकेला खाली उतरले. ते चालू लागले. त्याला पाहून साहेब म्हणाले की त्याला जाऊ द्या परत, त्याची काही इच्छा दिसत नाही. चांगली आठवण आहे. ते लघुशंकेसाठी उतरले आणि चालू लागले परत. त्याला सांगत होते की तुला पाठवायची व्यवस्था करतो, पण तो घाबरलेला होता. आम्हालाही ट्राफिक क्रॉस करायचं होतं. एका आमदारासाठी इतर आमदार रिस्क घेणार नव्हते. मग आम्ही पुढे चालले गेलो.
गुजरातमध्ये प्रवेश
गुजरात लागल्यावर लक्षात आलं की ऑपरेशन सुरु झालो. मग आन्ही मोजू लागलो की किती लोकं आहेत. हा ही मुद्दा आहे. वेगवेगळ्या गाड्यांमध्ये लोकं होती. एकूण १०-११ गाड्या होत्या. कुणीकडे एक कुणीकडे दोन, कुणीकडे तीन असे वेगेवगळ्या गाडीत लोकं होती. गप्पा मारत मारत लोकं पुढं गेली. त्यांनाही कळआलं नाही आणि मलाही कळालं नाही. तिथं गेल्यावर गुजरात पोलीस दिसले आम्हाला. मी म्हटलं की इकडं तर सगळी तयारी झालेली आहे. मला आश्चर्यच वाटलं. राज्याची पोलीस तर मागे गेली मग ही कोणती पोलीस आली, याचा आम्हाला प्रश्न पडला.
नितीन देशमुखांसाठी विमान
तिथं गेल्यानंतर मग हॉटेलमध्ये गेलो. तिथे गेल्यावर नितीन देशमुख यांची छाती दुखू लागली. इकडे पड, तिकडे पड, ते बैचेन होते. साहेबांनी विचारलं की तुझी अडचण काय आहे. त्यावर तो म्हणाला की मला माझ्या बायकोला भेटायला जायचंय म्हणे. त्यांना दवाखान्यात नेलं. पण ते म्हणाले की मला माझ्या बायकोकडेच जायचंय, मग एक प्रायव्हेट चार्टर प्लेन विमान मागितलं आणि त्या विमानात त्यांना आणि ठाण्यातील दोन कार्यकर्ते दिले, कुणावर जबरदस्ती नाही म्हणाले इथे. विमानात बसवून त्याला अकोल्याला पाठवले. त्यांनी त्यांच्या आई बापाची शप्पथ घेऊन सांगावं की विमानाने पाठवलं होतं की नव्हतं, आमच्या सोबत होते ते. आमच्या गाडीत होते. धाब्यावरुन ते एकनाथ शिंदे यांच्या गाडीत आले होते. मी, भोमरे, शिंदे आणि ते एका गाडीत आलो. ते संभ्रमात होते.
एकनाथ शिंदे यांचा संयम
एवढ्या टेन्शनमध्येही एकनाथ शिंदे यांचा संयम दिसला. त्यांनी त्या परिस्थितीतही सांगितले की त्यांची इच्छा नसेल तर जाऊ द्या. बळजबरी नाही कुणावर. एक दिवसाचा खेळ नाही आहे हा, खूप दिवस चालेल हे. मोठी प्रक्रिया आहे ही. कुणाला बळजबरीने थांबवायचे नाही आपल्याला. असे शिंदे म्हणाले. इतर आमदारांना त्यांनी विचारलं की कुणाला जायचं आहे का, सांगा, सगळ्यांना देतो. मला कुणालाही बदनाम करायचे नाही. जी काय चूक असेल तर त्याची जबाबदारी आपण स्वीकारु असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मी जे करतोय त्याची जबाबदारी माझी, तुमच्यावर कुठलीही जबाबदारी येणार नाही, असे त्यांनी सांगितले. तेव्हा ३२ लोकं आहेत. ५० लोकांची जबाबदारी, विकास निधी, प्रश्न आपण सोडवू, भविष्यात तुम्ही निवडून याल, अशा पद्धतीने काम करु. दुसऱ्या मार्गाने चाललो नाही, बाळासाहेबांच्या विचाराने चाललो आहोत. युतीच्या विचाराने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
विमानाने एक गेला, नंतर काही आमदार एम्ब्युलन्सने आले
काही लोकं ट्रेन, एसटी आणि काही जण एम्ब्युलन्सने आले. लोकांची इच्छा होती. त्या परिस्थितीत हा शिंदेंचा एकट्याचा उठाव न्वहता. शिंदेंकडे चांगली खाती होती. पण चलबिचल करणाऱ्या आमदारांसाठी त्यांनी हा निर्णय घेतला. दीड ते दोन वर्षांपासून माझे अनेक प्रश्न पेंडिंग होते. चार दिवसांत सिल्लोड मतदारसंघात त्यांनी स्वातंत्र्यानंतर मिळाला नसेल इतका निधी त्यांनी मला दिला. वॉटर ग्रीड ६६० कोटी जीआर निघाला. सर्व पाणीपुपरवठा योजना एकाच ठिकाणी, फिल्टर पाणी योजना. शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून सूतगिरणी ८० कोटी ९० लाख रुपयांची मंजूर केली. ५० टक्के निधी वितरीत केला, असेही सत्तारांनी सांगितले.