अक्षय कुमार कॅनडाच्या नागरिकत्वाविषयी खरं बोलत आहे की खोटं?
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘अराजकीय’ मुलाखत घेतल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार चांगलाच चर्चेत आला आहे. या मुलाखतीनंतर जेवढी चर्चा मोदींनी दिलेल्या उत्तरांची झाली त्याहून अधिक अक्षयने विचारलेल्या प्रश्नांची झाली. त्यानंतर चर्चा एवढ्यावरच थांबली नाही तर अक्षय कुमार नेमका भारतीय आहे, की कॅनडीयन? याचीही चर्चा सुरु झाली. अक्षय कुमारने अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम करुन आपली […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘अराजकीय’ मुलाखत घेतल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार चांगलाच चर्चेत आला आहे. या मुलाखतीनंतर जेवढी चर्चा मोदींनी दिलेल्या उत्तरांची झाली त्याहून अधिक अक्षयने विचारलेल्या प्रश्नांची झाली. त्यानंतर चर्चा एवढ्यावरच थांबली नाही तर अक्षय कुमार नेमका भारतीय आहे, की कॅनडीयन? याचीही चर्चा सुरु झाली.
अक्षय कुमारने अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम करुन आपली प्रतिमा एक राष्ट्रभक्त करण्यात चांगलेच यश मिळवले आहे. मात्र, मुंबईत लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी अक्षय कुमारला एकाने मतदान का करु शकला नाही अशी विचारणा केली. त्यानंतर त्याच्या नागरिकत्वावर अनेकजण प्रश्न विचारु लागले आहेत. अखेर अक्षयला यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली.
“माझ्या नागरिकतेवर अनावश्यक आणि नकारात्मक चर्चा का होत आहे हे मला समजत नाही. माझ्याकडं कॅनडाचा पासपोर्ट आहे हे मी कधीही लपवलेलं नाही किंवा त्याला नकारही दिलेला नाही. तसेच मागील 7 वर्षात मी एकदाही कॅनडाला भेट दिली नाही हेही तेवढंच खरं आहे. मी भारतात काम करतो आणि सर्व कर भारतातच भरतो. मागील एवढ्या काळात मला कधीच माझे देशावरील प्रेम कधीही सिद्ध करण्याची वेळ पडली नाही. माझे नागरिकत्व ही खूप व्यक्तीगत, कायदेशीर, अराजकीय गोष्ट आहे. तरिही त्यावर वाद होत आहे याचे मला दुःख आहे. मी यापुढेही देशाला अधिक सशक्त बनवण्यासाठी माझ्या पद्धतीने माझे योगदान देत राहिल.”
– अक्षय कुमार
अक्षय कुमारला खरंच मानद नागरिकत्व मिळाले आहे?
अक्षय कुमारने आपल्या एका ट्विटमध्ये कॅनडाचा पासपोर्ट असल्याचे म्हटले, मात्र जी गोष्ट त्याने अनेकदा सार्वजनिकपणे सांगितली आहे ती या ट्विटमध्ये नमूद केली नाही. अक्षयने याआधी कॅनडाने आपल्याला मानद नागरिकत्व दिल्याचे सांगितले आहे. तसेच देशवासीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, असेही त्यांनी म्हटले. त्याने म्हटल्याप्रमाणे कोणत्याही देशाचे मानद नागरिकत्व मिळणे ही नक्कीच मोठी गोष्ट आहे आणि त्याचा देशवासीयांना अभिमानही वाटायला हवा. मात्र, अक्षय कुमारने मानद नागरिकत्वाची बाब आपल्या ट्विटमध्ये का नमूद केली नाही हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
अक्षय कुमारला मानद नागरिकत्व दिल्याची नोंद नाही
कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने आपल्या वेबसाईटवर आतापर्यंत कॅनडाने ज्या व्यक्तींना मानद नागरिकत्व दिले त्यांची यादी जाहिर केली आहे. (आपण या लिंकवर जाऊन स्वतः ती यादी पाहू शकता.) सोबत संबंधित व्यक्तींना कोणत्या कामाबद्दल हे मानद नागरिकत्व दिले याचेही कारण दिले आहे. मात्र, या यादीत अक्षय कुमारचे नाव कोठेही नाही. त्यामुळे अक्षय कुमारच्या मानद नागरिकत्वाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
कॅनडाचे मानद नागरिकत्व कुणाला मिळू शकते?
कॅनडाच्या संसदेने मानद नागरिकत्व कुणाला द्यावे याचे काही नियम आणि निकष बनवले आहेत. यात म्हटले आहे, की जी व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत ऐतिहासिक योगदान देईल, त्यालाच मानद नागरिकत्व दिले जाईल.
या निकषाचा विचार केल्यास अक्षय कुमार या निकषात बसेल असे कोणतेही ऐतिहासिक काम सध्या तरी अक्षय कुमारच्या नावावर नाही.
आतापर्यंत कॅनडाचे मानद नागरिकत्व कुणाला मिळाले?
कॅनडाने आतापर्यंत मानद नागरिकत्व दिलेल्या व्यक्तीमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला यूसुफझाई, हंगेरीत नाझींपासून हजारों यहूदी मुलांना वाचवणाऱ्या राओल वॉलेनबर्ग, वर्णभेदाची लढाई लढणारे नेल्सन मंडेला, बौद्ध धर्मगुरु दलाई लामा, म्यानमारच्या प्रमुख आंग सान सू आणि शिया पंथाचे 49 वे इमाम आगा खां यांचा समावेश आहे. यापैकी म्यानमारच्या आंग सान सू यांच्यावर मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे आरोप झाल्याने त्यांचे मानद नागरिकत्व परत घेण्यात आले.
यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मानद नागरिकत्व मिळणाऱ्या व्यक्तीला पासपोर्ट दिला दिला जात नाही. तसेच त्यांना कॅनडात मतदानाचाही अधिकार नसतो. त्यामुळे अक्षय कुमारकडे पासपोर्ट कसा हाही प्रश्न तयार होतो. त्यामुळेच अक्षय कुमार आपल्या नागरिकत्वाबाबत खरं बोलतो की खोटं याची चर्चा सुरु आहे.