मुंबई: महापारेषणच्या उपकेंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वीज पुरवठा दीर्घकाळ खंडित झाल्याच्या प्रकारानंतर सध्या महाविकासआघाडी सरकारला विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी ट्विट करून म्हटले आहे. (conspiracy behind power cut in Mumbai )
सोमवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या परिसरातील वीजपुरवठा एकाचवेळी खंडित झाल्यामुळे जनजीवन ठप्प झाले होते. रेल्वे वाहतूक, कार्यालयीन कामकाज, रुग्णालये, कोविड सेंटर आणि दैनंदिन व्यवहारांना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोठा फटका बसला होता. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत जवळपास तीन तास वीज नव्हती. त्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.
सोमवार दिनांक 12.10.20 रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) October 13, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीची बैठक बोलावली होती. यानंतर तांत्रिक बिघाडाची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होते.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपात असू शकतो का, यादृष्टीने चौकशी होऊ शकते.
वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मुंबईत खूपच गोंधळ पाहायला मिळाला होता. वीज नसल्याने अनेक भागांत मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली होती. यामुळे घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला. तर मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनही वीज नसल्यामुळे ठप्प झाल्या होत्या. तर रुग्णालये आणि कोव्हिड सेंटर जनित्रावर चालवण्याची वेळ आली.
गेल्या दशकभरात मुंबईत इतक्या दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित होण्याची ही चौथी वेळ आहे. आगामी काळात असे प्रकार घडणार नाहीत, यादृष्टीने आता सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी काय काय सुधारणा करण्याची गरज आहे, याबाबतच्या पर्यायांवर आता नव्याने चर्चाही सुरु झाली आहे.
संबंधित बातम्या:
Mumbai Power cut: मुंबईतील वीजपुरवठा खंडित का झाला; तांत्रिक बिघाडाची चौकशी करणार- नितीन राऊत
मुंबई-ठाण्यात वीजेचा ब्रेकडाऊन होणं ही शरमेची बाब; माजी ऊर्जामंत्र्यांचा सरकारवर हल्लाबोल
Mumbai Power Cut | मुंबईतील वीज गायब, नेमकं कारण काय?
Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल
(conspiracy behind power cut in Mumbai )