मेट्रोचा हा अडसर दूर झाला, मेट्रो 2अ आणि 7 चा दुसरा टप्पा सुरू होण्याचा मार्ग मोकळा
मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गिकेवरील दुसऱ्या टप्प्याच्या वाहतुकीसाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. या प्रमाणपत्रामुळे दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई : मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन 19 जानेवारी रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांद्वारे रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग सिस्टीम, सिव्हिल वर्क्स, ट्रॅक आणि स्पीड ट्रायलची चाचणी पूर्ण झाली आहे, मेट्रो रेल्वे सिस्टीमच्या सार्वजनिक वापरासाठी आवश्यक असलेले सुरक्षा प्रमाणपत्र आज एमएमआरडीएला मिळाले आहे. त्यामुळे मेट्रो 2अ आणि 7 चा दुसरा टप्पा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. 19 जानेवारी रोजी होणाऱ्या पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या एसओडी, डीबीआर, ट्रॅक्शन आणि पॉवर सप्लाय सिस्टीम, रोलिंग स्टॉक, ट्रॅक स्ट्रक्चर, फास्टनिंग सिस्टीम, S&TC आणि पीएसडीसाठी RDSO कडून तांत्रिक मान्यता आणि प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर, एमएमआरडीएने अंतिम सुरक्षा तपासणीच्या दृष्टीने CMRS च्या मेट्रोच्या विविध घटकांच्या सखोल आणि आवश्यक त्या सुरक्षा चाचण्यांची आवश्यक पूर्तता केल्यानंतर CMRS तर्फे एमएमआरडीएला सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 ( टप्पा 2) साठी एमएमआरडीएला आज सीएमआरएस, सेफ्टी सर्टिफिकेट मिळाले आहे. मुंबईकरांना जागतिक दर्जाची सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. मेट्रोच्या या टप्प्याचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज गुंदवली मेट्रो स्थानकाची पाहणी केली अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास यांनी सांगितले.