मुंबई : रविवारी सकाळी पावणेनऊ वाजतापासून अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर समर्थक आमदार येण्यास सुरुवात झाली. दिग्गज नेते अजित पवार यांच्या भेटीसाठी येत होते. आमदार किरण लहामाटे, दौलत दरोडा सर्वात आधी अजित पवार यांच्या भेटीला आले. सकाळी नऊ वाजता धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. सकाळी साडेनऊ वाजता हसन मुश्रीफ, दिपील वळसे पाटील हे अजित पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले. सकाळी दहा वाजता सुप्रिया सुळे या देवगिरी बंगल्यावर पोहचल्या. रविवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांची प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले.
रविवारी सकाळी ११ वाजता समर्थक आमदारांची अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू झाली. सकाळी सव्वाअकरा वाजता बैठक सुरू झाल्यानंतर छगन भुजबळ आणि काही आमदार पोहचले. दुपारी १२ वाजता सुप्रिया सुळे या देवगिरी निवासस्थानावरील बैठकीतून बाहेर निघाल्या. त्यानंतर पुन्हा साडेबारा वाजता सुप्रिया सुळे बैठकीत दाखल झाल्या.
एक वाजून २२ मिनिटांनी अजित पवार हे सत्तेत सहभागी होणार ही बातमी सर्वात आधी टीव्ही ९ च्या हाती लागली. ती सर्वात आधी प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात आली. दुपारी एक वाजून २५ मिनिटांनी अजित पवार, छगन भुजबळांचे पीए राजभवनावर दाखल झाले. रविवारी दुपारी दीड वाजता देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरून राजभवनाकडे रवाना झाले. दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटांनी अजित पवार आणि छगन भुजबळ समर्थक आमदारांसोबत राजभवनावर दाखल झाले.
एक वाजून ४० मिनिटांना प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते राजभवनावर दाखल झाले. १ वाजून ४२ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस राजभवनावर पोहोचले. शपथविधीची तयारी पूर्ण झाली. १ वाजून ५० मिनिटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजभवनावर दाखल झाले. दुपारी अडीच वाजता राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी अजित पवार यांच्यासह मंत्रीपदाची शपथ घेतली.