महामोर्चाला दीड लाख लोक येणार, बॅनर्स झळकले, टी शर्ट तयार; आघाडी शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत; महामोर्चा ऐतिहासिक ठरणार?
मोर्चेकऱ्यांच्या बसेस भायखळा जंक्शनपर्यंत येतील. त्यानंतर बसमधील लोक रिचर्डसन अॅण्ड क्रूडास कंपनीमध्ये जमतील. या कंपनीत दीड लाख लोक जमा होऊ शकतील इतकी व्यवस्था आहे.
मुंबई: महापुरुषांच्या अवमानाविरोधात उद्या शनिवार दिनांक 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या महामोर्चाची महाविकास आघाडीने जय्यत तयारी सुरू केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपआपल्या पातळीवर या महामोर्चाची जोरदार तयारी सुरू केली आहे. या महामोर्चासाठी बसेस भरून भरून लोक येणार आहेत. जवळपास दीड लाख लोक या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडीचा हा महामोर्चा ऐतिहासिक ठरणार असून या महामोर्चाच्या माध्यमातून आघाडीकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या महामोर्चाकडे संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचंही लक्ष लागलं आहे.
उद्या निघणाऱ्या महामोर्चाला अद्यापही परवानगी देण्यात आली नसली तरी महाविकास आघाडीकडून महामोर्च्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. महामोर्चाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत. तब्बल दीड लाख लोक येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबईत या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली असून मुंबईभर बॅनर्स लावण्यात आले आहेत.
या मोर्चासाठी खास टीशर्टही तयार करण्यात आले आहेत. त्यावर हल्लाबोल असं लिहिलं आहे. तसेच महाविकास आघाडीचा महामोर्चा, शिवसेना असंही या टीशर्टवर लिहिलं आहे.
मोर्चेकऱ्यांच्या बसेस भायखळा जंक्शनपर्यंत येतील. त्यानंतर बसमधील लोक रिचर्डसन अॅण्ड क्रूडास कंपनीमध्ये जमतील. या कंपनीत दीड लाख लोक जमा होऊ शकतील इतकी व्यवस्था आहे. लोक जमा झाल्यानंतर त्यांना मोर्चाचे नियम समजावून सांगितले जातील. तसेच शिस्तचं पालन करण्याचं आवाहनही करण्यात येईल. त्यानंतर क्रूडास कंपनीतून हा मोर्चा निघेल.
भायखळ्याच्या क्रुडास कंपनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. त्यामुळे मोर्चेकऱ्यांसाठी या मार्गावर जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्ता आली आहे. मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी प्रत्येकाला ठरवून दिली जात आहे.
मोर्चाला येणाऱ्या लाखो लोकांची नीट व्यवस्था व्हावी यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अपार मेहनत घेत आहेत. महाविकास आघाडीच्या महामोर्चाचे मुंबईत ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
या मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच मोर्चा नीट पार पडावा म्हणून महाविकास आघाडीकडून स्वयंसेवकही तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.