लोकसभेच्या निवडणुका होताच, आता अजित पवार गटाकडून विधानसभेसाठी जागांची मागणी सुरु झालीय. शिंदेंचे खासदार जास्त आले असले, तरी त्यांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला द्या, अशी मागणी मंत्री भुजबळांनी केलीय. तर मंत्री अनिल पाटलांनी 80 जागांचा दावा केलाय.
विधानसभेच्या जागा वाटपावरुन, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आता उघडपणे बोलायला लागलेत. आधी मंत्री अनिल पाटलांनी 80 जागांची मागणी केली. दुपारी राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून भुजबळांनी पुन्हा 80 जागांवर ठाम राहत.जागा वाटपाचं गुऱ्हाळ नको, असं म्हटलंय. 6 महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत..मात्र जागा वाटप होत असताना भुजबळांनी शिंदे गटाऐवढ्याच जागा हव्यात. शिंदेंचे खासदार जास्त आहेत असं बोलू नका, हेही भुजबळांनी आवर्जून सांगितलं.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 48 जागा पैकी भाजपनं 28 जागा लढल्या. शिंदेंच्या शिवसेनेला 15 जागा मिळाल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या. त्यामुळं भुजबळांनी मुद्दाम शिंदेंच्या शिवसेनेप्रमाणं समसमान जागांचा उल्लेख केलाय. भाजपकडे स्वत:चे 105 आणि मित्रपक्ष असे एकूण 114 आमदार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडे स्वत:चे 40 आणि इतर 10 असे 50 आमदार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडेही 40 आमदार आहेत. स्वाभाविक आहे वाटा भाजपचाच अधिक असेल पण शिंदे गटाऐवढ्याच जागा आम्हालाही मिळाव्यात, असं भुजबळांचं म्हणणंय.
इकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी शिंदे आणि अजित पवार गटाचेच 40 आमदार परतील, असा दावा केलाय. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला आणि महाविकास आघाडीनं 30 खासदार निवडून आणले. आता नजरा विधानसभेच्या निवडणुकांकडे आहेत. मात्र विधानसभेत महाविकास आघाडीला 180-185 जागा जिंकणार, असा दावा राऊतांनी केलाय.