Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : अजित दादा 90 वरुन 60 जागांवर आले?, पाहा Video
जागा वाटपावरुन अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय. 60 जागांवर कामाला लागू शकता, असं अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणालेत. याआधी अजित पवारांनी 90 जागा लढणार असल्याचं म्हटलं होतं, आता त्यामुळं आता दादा 60 जागांवर राजी झालेत का?, अशी चर्चा आहे.
अजित पवारांनी उघडपणे 60 जागांचं गणित मांडून, कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्यात. 2019च्या निकालानुसार राष्ट्रवादीचे 54, 3 अपक्षासह काँग्रेसचे हिरामण खोसकर, झिशान सिद्धीकी आणि सुलभा खोडके आपल्यासोबतच आहेत, असं अजित पवार म्हणालेत. मात्र आता चर्चा अशी आहे, 90 जागांवरुन दादा 60 जागांवर आलेत का? महायुतीत सहभागी होताच, अजित पवारांनी 90 जागा लढणार असल्याचं म्हटलं होतं. पण आता अजित पवारांनी 60 जागांचा उल्लेख केल्यानं, वडेट्टीवारांनी खिल्ली उडवलीय. 60 वरुन आता 40 वरही येतील, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला.
अजित पवारांनी 60 जागांचा उल्लेख केला. तर भाजपचे नेते भागवत कराडांनी भाजपही 111-112 जागांवर तयारी असल्याचं म्हटलंय. विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. भाजपनं मिशन 125साठी 150 जागा लढवाव्यात असं ठरवल्याची माहिती आहे. त्यामुळं 138जागा शिल्लक राहतात..या 138 मधून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळतील. जागा वाटपात भाजप,शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच होणार आहे.
2019च्या विधानसभा निवडणुकीत, 27 पैकी 19 मतदारसंघ असे आहेत. जिथं भाजपच्या उमेदवारांना पराभूत करुन राष्ट्रवादीनं विजय मिळवला. आणि हे 19 आमदार सध्या अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळं या 19 जागा पूर्णच्या पूर्ण दादांच्या राष्ट्रवादीला सोडणार का? 2 नंबरवर राहिलेल्या भाजपच्या नेत्यांचं काय ? हा प्रश्न आहे. तर 8 मतदारसंघ असे आहेत की, राष्ट्रवादीनं शिवसेनेला पराभूत करत विजय मिळवला ते 8 आमदार अजित पवारांसोबत आहेत. पराभूत झालेले 8 नेते शिंदेंसोबत आहेत त्यामुळं इथं काय होणार? हे ही पाहणं महत्वाचं आहे. म्हणजे पराभूत झालेल्या अर्थात 2 नंबरवर राहिलेल्या भाजप तसंच शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची अडचणी वाढणार आहेत.
जसं इंदापूरमध्ये दत्ता मामा भरणे आमदार असून भाजपकडून हर्षवर्धन पाटीलही इच्छुक आहेत..आणि जागा सुटणार नाही म्हणून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. कागलमध्ये हसन मुश्रीफ आमदार आहेत. तिथं भाजपचे समरजित घाटगे इच्छुक होते. मात्र तिकीट मिळणार नाही म्हणून त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला.
मावळमध्ये सुनिल शेळके आमदार आहेत. इथं पराभूत झालेले बाळा भेगडे पुन्हा शर्यतीत आहेत. माजलगावमध्ये प्रकाश सोळंके दादाचे आमदार आहेत. इथं पराभूत झालेले रमेश कोकाटे इच्छुक आहेत. उदगीरमध्ये संजय बनसोडे दादांचे आमदार असून अनिल कांबळे पराभूत झालेत. ते पुन्हा रेसमध्ये आहेत. अहेरीतून धर्मरावबाबा आत्राम आमदार आहेत. इथं भाजपचे राजे अमरीश राव आत्राम पराभूत झालेत. त्यामुळं अमरीश रावांचं काय होणार, हाही प्रश्न आहे. लवकरच महायुतीची जागा वाटपाची बैठक पुन्हा सुरु होणार आहे, त्यात जागांवर आणखी मंथन होईल.