Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : महायुतीला बिनशर्त पाठींबा, पण मनसेला मदतीच्या बदल्यात मदत नाही?
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीची. लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठींबा दिला. पण पदवीधर निवडणुकीत मनसेच्या विरोधात भाजपनं उमेदवार देण्याची तयारी केलीय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी, लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठींबा देत, प्रचारही केला. पण विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीत भाजप काही मनसेला मदत करण्याच्या मूडमध्ये नाही. कोकण पदवीधर निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी, अभिजीत पानसेंना उमेदवारी दिली. त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेटही घेतली. शिदेंनी शुभेच्छा दिल्याचं पानसरेंनी सांगितलं. पण लोकसभेला बिनर्शत पाठींबा दिला त्यासाठी धन्यवाद आणि चर्चा न करता उमेदवार दिला त्यासाठी राज ठाकरेंना शुभेच्छा असं भाजपचे आशिष शेलार म्हणालेत.
कोकणच्या पदवीधर निवडणुकीत भाजपकडून पुन्हा एकदा आमदार निरंजन डावखरेंनाच उमेदवारीची शक्यता आहे. पण मनसेनं अभिजीत पानसेंना उमेदवारी दिलीय. विशेष म्हणजे जी प्रतिक्रिया भाजपची आहे, तीच प्रतिक्रिया अजित पवार गटाचीही आहे. प्रत्येक जण आपआपली उमेदवारी जाहीर करुन लढतोय. महायुती म्हणून लढत असल्याचं दिसत नाही, असं भुजबळ म्हणालेत. मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होतेय. मुंबई पदवीधरसाठी ठाकरे गटानं अनिल परबांना तर शिंदे गटाकडून डॉ. दीपक सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हं आहेत.
मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून ज.मो. अभ्यंकरांना उमेदवारी दिली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शिवाजीराव नलावडेंना उमेदवारी दिलीय. कोकण पदवीधरसाठी मनसेनं अभिजीत पानसेंना उमेदवारी दिलीय तर भाजपनं पुन्हा निरंजन डावखरेंना तिकीट देण्याची तयारी केलीय. काँग्रेसकडून रमेश कीर यांचं नाव आघाडीवर आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ठाकरे ठाकरे गटाकडून सध्याचे निवृत्त होणारे आमदार किशोर दराडेंना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार गटाकडून संदीप गुळवे स्पर्धेत आहेत.
कोकण पदवीधरमध्ये उमेदवार देताना, राज ठाकरेंनी चर्चा केली नाही. त्यामुळं पाठींबा नाही असा सूर मुंबई भाजपचे अध्यक्ष शेलारांचा आहे. म्हणजेच मनसेच्या लोकसभेच्या पाठींब्याची परतेफड होताना दिसत नाही.