Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | बदलापुरात साडे 3 वर्षांच्या 2 चिमुकलींसोबत काय घडलं? ही घटना कशी समोर आली?
बदलापुरातल्या आदर्श विद्यालय या शाळेत 2 चिमुकलींवर सफाई कर्मचाऱ्यानंच अत्याचार केले. मुलींनी दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्यास नकार दिला. त्यानंतर मेडिकल तपासणी केल्यावर धक्कादायक बाब उघडकीस आली. तर भाजपच्या लोकांशी संबंधित शाळा असल्यानं कारवाई दिरंगाई झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

साडे 3 वर्षांच्या 2 चिमुकलींवर अत्याचार झाल्यानंतर आदर्श विद्यालय, या शाळेची तोडफोड झाली. महिलांनीही शाळेच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. शाळेतल्या घटनेच्या विरोधात रोष व्यक्त केला. शाळेच्या प्रशासनावरही प्रकरण दाबल्याचा आरोप आहे. आधी ही घटना कशी उघडकीस आली, ते जाणून घ्या.
12 आणि 13 ऑगस्टला शाळेत 3 वर्षांच्या 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाले. लघुशंकेसाठी जाताना सफाई कर्मचारी आरोपी 22 वर्षीय अक्षय शिंदेनं लैंगिक अत्याचार केले. सू सूच्या ठिकाणी दुखतंय असं सांगून लहानग्या मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिला. पालकांनी तात्काळ डॉक्टरांकडे धाव घेतली आणि मुलींची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय तपासणीत दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं. त्यानंतर पालकांनी 16 ऑगस्टला पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत 12 तास पालकांना वाट पाहावी लागली. हलगर्जीपणा करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. तर आदर्श विद्यालय ही शाळा भाजपच्या लोकांशी संबंधित असल्यानं गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई झाली, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. संस्था चालकांना कसं वाचवता?, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.
उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे राजकारण करत असल्याचं गृहमंत्री फडणवीस म्हणालेत. तर मंत्री गिरीश महाजनांनी गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केल्याचं म्हटलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही ट्विट करुन संताप व्यक्त केलाय. बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करुन घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले ?. एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?. माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत तुमचं लक्ष असू द्या.
आदर्श विद्यालयानं माफीनामा जाहीर करत, सीसीटीव्ही तपासण्याची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई केलीय..आरोपी अक्षय शिंदेंला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलंय. तसंच लहान मुलींना प्रसाधनगृहात ने आण करण्याची जबाबदारी असलेल्या 2 सेविकांना शाळेनं नोकरीवरुन काढून टाकलंय. पण, मेडिकल रिपोर्टस् असतानाही पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई का केली ? पॉस्कोचं प्रकरण असतानाही 12 तास पोलिसांनी का लावले ?, याचाही तपास होईल असं आश्वासन मंत्री महाजनांनी दिलंय.