Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : लोकसभेचा आकडा, विधानसभेचा धुरळा
अनेक मतदारसंघात महायुतीच्या तिन्ही पक्षातले मतं एकमेकांना गेली की नाही, यावरुन चर्चा होतायत., कारण काही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असूनही मविआनं मोठं लीड घेतलंय. लोकसभा निकालानुसार विधानसभेचं चित्र कसं राहिलं. पाहा हा स्पेशल रिपोर्ट.
डबल इंजिन सरकारला तिसरं इंजिन म्हणून अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेले. मात्र लोकसभा निकालात महायुतीची मतं एकमेकांना ट्रान्सफर झाली का, अशी शंका विधानसभानिहाय निकाल पाहून येते. महायुतीत भाजपकडे 105 आमदार आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत याच 105 पैकी 42 जागांवर महायुतीचे उमेदवार पिछाडीवर राहिले. शिंदेंच्या शिवसेनेकडे 40 आमदार लोकसभेत यापैकी 14 आमदारांच्या मतदारसंघात महायुती मागे पडली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 40 आमदार. इथंही अजितदादांचे तब्बल 25 आमदार महायुतीला लीड देण्यात अपयशी ठरले.
पाहा व्हिडीओ:-
ही गोष्ट मविआबाबत इतक्या मोठ्या फरकानं दिसली नाही. याउलट महायुतीच्याच अनेक आमदारांच्या मतदारसंघात मविआ उमेदवारांनी आघाडी घेतली. ठाकरेंकडे या घडीला 15 आमदार आहेत. मात्र त्यांना 30 विधानसभांमध्ये लीड मिळालं. म्हणजे अधिकच्या 15 मतदारसंघात ते पुढे राहिले. काँग्रेसकडे 45 आमदार त्यांना 72 मतदारसंघात लीड मिळालं.म्हणजे आहे त्या आमदारांच्या संख्येहून 27 विधानसभांमध्ये लीड मिळालं. शरद पवारांकडे या घडीला 13 आमदार आहेत. त्यांना 52 विधानसभांमध्ये लीड मिळालं. म्हणजे आमदारांच्या संख्येहून जास्तीच्या 40 विधानसभांमध्ये मविआ आघाडीवर राहिली.या आकड्यांवरुन मविआतल्या ३ पक्षांमध्ये एकमेकांचं मतदान ट्रान्सफर झालं. मात्र महायुतीत तसं घडलं का., याबाबत तर्क-वितर्क लढवले जातायत. सत्ताधाऱ्यांमध्ये फक्त आमदारच नव्हे तर काही मंत्रिपदावर राहिलेले नेतेही आपल्या मतदारसंघात मताधिक्य मिळवून देवू शकले नाहीत.
मंत्री उदय सामंत रत्नागिरी विधानसभेचे आमदार इथल्या लोकसभेतून भाजपचे नारायण राणे लोकसभेला जिंकून आले. मात्र उदय सामंतांच्या स्वतःच्या मतदारसंघात राणे 10 हजारांहून जास्तीच्या मतांनी मागे राहिले. मंत्री तानाजी सावंत. भूम-परांडा विधानसभेचे आमदार इथं अजित पवार गटाच्या अर्चना पाटील 81 हजारांहून जास्तीच्य मतांनी पिछाडीवर राहिल्या. मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोडचे आमदार त्यांच्या मतदारसंघातून भाजपचे रावसाहेब दानवे 27 हजारांहून जास्तीच्या मतांनी पिछाडीवर राहिले. मंत्री संजय राठोड दिग्रसचे आमदार…त्यांच्या मतदारसंघातून शिंदे गटाच्याच उमेदवार राजश्री पाटील 8 हजार 600 मतांनी मागे राहिल्या. आमदार यामिनी जाधव भायखळ्याच्या आमदार. लोकसभेला यंदा उभ्या होत्या, मात्र त्यांच्याच मतदारसंघात 46 हजार मतांची पिछाडी मिळाली.
सर्वाधिक धक्कादायक पिछाडी अजित पवारांच्या गटाला मिळाली. अजितदादांचे तब्बल 6 मंत्री आपल्याच मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्क्य देवू शकले नाहीत. मंत्री दत्ता भरणे बारामती लोकसभेसाठी इंदापुरातून महायुतीला 55 हजारांहून जास्तीची पिछाडी मिळाली. स्वतः अजित पवार…बारामतीत 47 हजारांहून जास्तीची महायुतीला पिछाडी मिळाली मंत्री दिलीप वळसे-पाटील. शिरुर लोकसभेत येणार्या आंबेगावात महायुती 11 हजार मतं मागे राहिली. मंत्री छगन भुजबळ…दिंडोरी लोकसभेसाठी येवला मतदारसंघातून महायुतीला 13 हजारांहून जास्तीची पिछाडी मिळाली. नरहरी झिरवाळ… यांच्या दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या भारती पवार 82 हजार मतांनी पिछाडीवर राहिल्या. मंत्री धर्माराव अत्राम अहेरी मतदारसंघात महायुती १२ हजारांहून जास्त मतांनी मागे राहिली.
भाजपचेही अनेक बडे नेते मतदारसंघात लीड राखू शकले नाहीत. मंत्री अतुल सावेंच्या संभाजीनगर पूर्व विधानसभेत महायुती 25 हजारांहून जास्त मतांनी पिछाडीवर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्याच पुत्राच्या मतदारसंघात 962 मतांनी मागे पडले. भाजपचे रणजितसिंहराणा पाटलांच्या तुळजापुरातून महायुती 52 हजारांहून जास्त मतांनी पिछाडीवर सुधीरभाऊ आमदार असलेल्या बल्लारपूर विधानसभेतच यंदाच्या लोकसभेला 48 हजार मतांची पिछाडी मिळाली. विधानसभा आणि लोकसभेचे मुद्दे निरनिराळे असतात. अनेक ठिकाणी उमेदवार पाहून आणि स्थानिक समीकरणांनी मतदान होतं., मात्र ज्याप्रमाणे विधानसभेच्या आमदारांवरुन लोकसभेची आकडेमोड केली जाते. त्यानुसार नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या आकडेवारीनं अनेकांची धाकधूक वाढवलीय.