Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : ‘शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काही होत नाही’; केसरकरांचे संतापजनक विधान
इंदापूरचे हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत., त्यावर स्वतः ते काय म्हणाले. जवळपास भाजपच्या १९ नेत्यांमागे तिकीटाचं टेन्शन का आहे.
महाराष्ट्राच्या दैवताचा पुतळा तुकड्या-तुकड्यांचा रुपात कोसळलेला पाहून लोकांचं रक्त खवळलं. त्यावर महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याचे सर्वेसर्वा असणाऱ्या दीपक केसरकरांनी संतापजनक विधान करुन आगीत तेल ओतण्याचं काम केलं. पुतळा कोसळल्यावर ”ही कदाचित नियती असेल. शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काही होत नाही, अशी शरम आणणारी सारवासारव मंत्री केसरकर करतायत ते सुद्दा एक-दोन नव्हे तर चार वेळा.
मुख्यमंत्री शिंदेंच्या दाव्यानुसार वारे ताशी 45 किमी वेगानं वाहत असल्यामुळे महाराजांचा पुतळा कोसळला. भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण सांगतायत की समुद्री वाऱ्यांमुळे स्टीलला गंज लागल्यामुळे पुतळा कोसळला असावा. शिक्षणमंत्री केसरकरांनी तर थेट कदाचित ही शिवाजी महाराजांची इच्छा असावी म्हणून ते नियतीवर ढकलून दिलंय. ताशी 45 किलोमीटर वेगानं वारं वाहिल्यामुळे पुतळा कोसळल्याचं उत्तर सरकारकडून दिलं गेलं. मात्र हवामान विभाग तज्ज्ञांच्या मते समुद्रकिनारी या वेगाचे वारे वाहणं ही साधारण गोष्ट आहे. शिवाय काल मालवणात कोणतंही झाडं तुटणे, घरांची पत्रे उडणे असा प्रकार समोर आलेला नाही. जाणकारांच्या मते मुळात समुद्रकिनारी पुतळे उभारताना त्याठिकाणी वाहणाऱ्या वाऱ्यांची मागच्या १५ वर्षांपूर्वीचा इतिहास तपासला जातो. वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग अभ्यासूनच पुतळे उभे केले जातात. त्यामुळे चूक वाऱ्याची नव्हे तर स्ट्रक्चरची होती, हे अनेक शिल्पकार सांगतायत.
संभाजीराजे छत्रपती, इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी खूप महिन्यांआधीच शिल्पावरुन प्रश्न उपस्थित केले होते. मूर्तीची एकूण उंची आणि हातांच्या लांबीत विसंगती दिसत होती. महाराजांच्या तलवारीची डिझाईन, अंगरखाही वेगळा भासत होता. स्वतः पीडब्लूडीनं ऑगस्ट महिन्यात नौदलानं पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती.
पाहा व्हिडीओ:-
पत्रात लिहिलं होतं की जून महिन्या शिल्पकार जयदिप आवटेनं पुतळ्याची डागडुजी केली. मात्र शिवरायांच्या पुतळ्यासाठी आपण नटबोल्टचा वापर केला. ते समुद्रातल्या खाऱ्या वाऱ्यांमुळे नटबोल्ट्सनी गंज पकडलाय. महाराजांचा पुतळा त्यामुळे विद्रूप दिसतोय. पर्यटक-स्थानिक लोक यावर नाराजी व्यक्त करतायत. नौदलानं शिल्पकारास आदेश देवून योग्य पावलं उचलावीत. मात्र या पत्राचं पुढे काय झालं., त्यावर नौदलानं काहीही कारवाई केली नाही का, याचं उत्तर कुणाकडेही नाहीय.
दुसरीकडे कल्याणला राहणाऱ्या जयदिप आपटेची एक मुलाखत व्हायरल होतेय. त्यात कौतूक म्हणून त्यानं जी उत्तरं दिलीयत.. तीच मुळात धक्कादायक आहेत. 4 डिसेंबर 2023 ला दैनिक सनातन प्रभातनं शिल्पकार जयदिप आपटेची मुलाखत छापली यात सुरुवातील म्हटलं गेलंय की., 28 फूट उंच ब्रॉन्झचा पुतळा उभारणीस किमान ३ वर्ष लागतात, मात्र 24 वर्षीय जयदिप आपटेनं जूनमध्ये काम सुरु करुन डिसेंबरमध्ये म्हणजे फक्त ६ महिन्यात पूर्ण केलं.
दुसरा उल्लेख आहे की नौदलाच्या सूचनेनंतर बनवलेले शिल्प न निवडता अचानक बनवले गेलेले शिल्प पुतळा म्हणून निवडण्यात आले. पुरेसा अनुभव नसतानाही इतकं मोठं काम मिळाल्यानंतर जयदिप आपटे म्हणतो की, पुतळ्याचं काम मिळाल्यानंतर वाटलं की संधी मोठी आहे. व्यवस्थिप पार पडलं तर सगळीकडे नाव होईल. पण जरा चूक झाली तर सगळं संपेल असंही वाटलं पण ठरवलं की काय व्हायचं ते होऊ दे, पण संधी सोडायची नाही. मग एका आठवड्यात शिवरायांच्या पुतळ्याचे 3 लहान मॉडेल तयार केले. यापैकी दोन नौदलाच्या सुचनेनुसार तर तिसरं मॉडेल अचानक घडलं होतं. पुतळ्यासाठी नेमके तेच शिल्प निवडले गेले इतक्या कमी वेळात 3d प्रिंटिंगनेच पुतळा उभा राहणार होता, म्हणून काम सुरु केलं. पण काही गणितं चुकल्यामुळे वेळ गेला. तेव्हा अचानक पूर्ण मॉडेलच 3d प्रिटिंगनं तयार करायचं ठरवलं. मग एका रात्री 18 प्रिंटर उभे करुन काम सुरु झालं.
मोठ्या मंडळाची गणेश मूर्ती सुद्दा 8 महिने आधी बनवणं सुरु होतं. इथं 28 फुटांचा काश्याचा पुतळा फक्त 6 महिन्यात उभारला गेला. तो सुद्दा फार अनुभव नसलेल्या एका 24 वर्षीय शिल्पकाराकडून पुतळा 6 महिन्यातच तयार करुन हवा, हा आग्रह कुणाचा होता? जर नौदलानं व्यवस्थित नियोजन केलं होतं, तर फक्त 6 महिन्यांआधीच शिल्पकाराला का काम दिलं गेलं ही सर्व घाई कशासाठी करण्यात आली., ही प्रश्न अनुत्तरित आहेत.
पुतळ्याच्या आत हे सपोर्टसाठी या अशा प्रकारचे लोखंडी अँगल वापरले गेले होते. पायांमधून तर फक्त एक-एक अँगलचा सपोर्ट होता. साधारणपणे लोखंड ३ प्रकारात येतं. एक एमएस…दुसरं जीपी… आणि तिसरं जीआय…एमएस लोखंडाचा वापर दरवाजे-खिडके- ग्रील-सेफ्टी डोअरच्या कामात होतो. जीपी लोखंड हे प्रामुख्यानं मोबाईलचे टॉवर, पथदिव्यांसाठी वापरलं जातं. जीआय लोखंड हे मोठे पूल, स्टेडियममधले हायपॉवर लाईट्चे खांब किंवा मोठ्या पुतळ्यांच्या उभारणीत वापरात येतं जीआय लोखंडला गंज लागण्याचा धोका फार कमी असतो., मात्र खुद्द भाजपच्या रविंद्र चव्हाणांनी गंज लागत असल्याचं सांगितल्यामुळे या कामात कोणतं लोखंड वापरलं गेलं, हे समोर येणंही गरजेचं आहे.
या साऱ्या प्रकारावर शिक्षणमंत्री केसरकरांचा आत्मविश्वास स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या उंचीलाही ठेंगणं ठरवत होता . म्हणजे 18 तासांपूर्वीच जिथं 28 फूट उंचीचा पुतळा कोसळलाय. त्याचठिकाणी उभं राहून केसरकर 151 फूट उंचीच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं उदाहरण देत नव्या पुतळ्याची ग्वाही देत होते. मुळात याला जबाबदार कोण. यावर फार न बोलता पुन्हा पुतळा उभा करु, पुन्हा पंतप्रधानांना उदघाटनासाठी बोलवू यावरच केसरकर भर देत होते.
ज्या शिवरायांना आपण भारतीय आरमाराचे जनक म्हणतो. ज्यांनी समुद्री वादळांहूनही मोठी आव्हानं पेलली. त्याच महाराजांचा पुतळा कोसळतो, ही आपल्या साऱ्यांना मान शरमेनं खाली घालायला लावणारी गोष्ट आहे. अनेक शिवकालीन बांधकामं आजही शाबूत आहेत. अनेकांच्या पायाला अद्याप साधे चिरेही गेले नाहीत. ते म्हणतात ना की शिवकाळातले बांधकामं जितकी कणखर आणि राकट होती. त्याहून अभेद्य ते बांधकाम उभं करणाऱ्यांचं इमान होतं. आज त्याच इमानाला कुठे गंज लागला. हे शोधण्याची गरज आहे. नाहीतर खेकड्यांनी पोखरलं म्हणून धरणं फुटत राहणार अमूक-तमूक मिमीचा पाऊस पडला म्हणून रस्ते खचत राहणार रणातून अचानक पाणी सोडलं म्हणून शहरं बुडत राहणार आणि समुद्री वाऱ्यांमुळे पुतळे कोसळत राहणार.