Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मनोज जरांगेंचं उपोषण सुरु, विधानसभेत पाडण्याचा इशारा, पाहा Video
मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा, उपोषणाची सुरुवात केलीय...सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा, अशी मागणी जरांगेंची आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर मग विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघात नावं घेवून पाडणार, असा इशाराच जरांगेंनी सरकारला दिलाय.
लोकसभेत कसा फटका बसला, हे जरांगेंनी सांगून सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. जालन्यातून रावसाहेब दानवे आणि बीडमधून पंकजा मुंडे पराभूत झाल्या. या दोन्ही मतदारसंघात जरांगे फॅक्टरचा परिणाम स्पष्ट दिसला. 27 जानेवारीला नवी मुंबईत मुख्यमंत्री शिंदेंनी कुणबी जातप्रमाणपत्राबाबत सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेचं पत्र जरांगेंना दिलं. असंख्य मराठ्यांसह मुंबईच्या दिशेनं निघालेल्या जरांगेंनी आंदोलन स्थगित केलं.त्याचवेळी सरकारनं अधिसूचनेवर हरकती मागवल्या. त्यानंतर लोकसभेच्या आचारसंहितेत पुढची प्रक्रिया थांबली. आता जरांगे पुन्हा सगेसोयऱ्यांवरुन आक्रमक झालेत.
सरकारनं जी अधिसूचना काढून मराठ्यांचा मोर्चा मुंबईकडे येण्यापासून थांबवला. त्यात सगेसोयऱ्यांची व्याख्या नेमकी काय आहे. सगेसोयरे म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक. रक्तातील नातेवाईक, पितृसत्ताक पद्धतीतील सगेसोयरे आहेत असं शपथपत्र पुरावा म्हणून अर्जदारानं दिल्यास गृहचौकशीद्वारे कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात येईल. ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्याआधारे गणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात येईल.
सरसकट मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र द्या अशी मागणी आधी जरांगेंची होती. त्यानंतर सगेसोयऱ्य़ांच्या व्याख्य़ेवरुन मध्यम मार्ग निघाला. पण आता अधिसूनचा कायद्यात बदलून कुणबी जातप्रमाणं वाटप सुरु करणार यासाठी जरांगेंनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय.
फडणवीस साहेब तुम्ही भ्रमात राहू नका जे घडलेले आहे ते मान्य करा. मराठ्यांच्या पोरांना आरक्षणाचा फायदा करून द्या आम्हाला आरक्षण द्या, गुन्हे मागे घ्या, मला राजकारणात जायचं नाही, आम्हाला आरक्षण द्या, जर तुम्ही मागण्या पूर्ण केल्या तर मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. तुम्ही जर आरक्षण दिलं नाही तर तुम्हाला एकालाही निवडून येऊ देणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.