Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | बारामतीचा पेपर सोपा की अवघड, पाहा व्हिडीओ
बारामतीत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या टिकेला शरद पवार गटानं अजित पवारांचाच जुना व्हिडीओ शेअर करुन उत्तरं दिलंय. मात्र चंद्रकांत पाटलांची विधानं. राजकीय नॅरेटिव्ह सेट करण्यात नेमकी कुणाला फायद्याची ठरु शकतात. मविआतल्या नेत्यांआधीच बारामती लोकसभेत महायुतीच्याच नेत्यांनी अजित पवारांना घेरलंय का, पाहा हा रिपोर्ट.
मुंबई : बारामतीत विरोधक सोडा पण महायुतीतलेच अनेक नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेरु लागलेयत. बारामती लोकसभेत येणाऱ्या पुरंदरच्या शिंदेंच्या सेनेचे नेते विजय शिवतारेंनी दंड थोपटले आहेत. अजित पवारांचे पदाधिकारी दमदाटी करतात म्हणून इंदापूरचे हर्षवर्धन पाटील फडणवीसांकडे तक्रार करतायत. हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील जर विधानसभेचा शब्द द्याल तरच लोकसभेत अजित पवारांना मतदान करु म्हणतायत. दौंडमधले भाजपचे आमदार राहुल कूल अद्याप सक्रीय झालेले नाहीत. त्यात बारामतीत जावून भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांचं महत्व अधोरेखित करुन अप्रत्यक्षपणे अजित पवारांना डिवचल्याचं बोललं जातंय.
पाहा व्हिडीओ:-
लोकसभेचं वारं सुरु झाल्यानंतर अजित पवारांनी सुरुवातीला शरद पवारांवर टीका केली. त्या टिकेला शरद पवारांच्या नेत्यांनी तोडीस तोड उत्तर दिलं. म्हणून नंतर शरद पवारांवरची टीका आपल्यावर बूमरँग होऊ नये म्हणून अजित पवारांनी एक पत्रक काढत यापुढे ज्येष्ठांवर टीका करणार नसल्याचं सांगितलं. तेव्हापासून अजित पवारांनी थेट शरद पवारांवर टीका केली नाही. मात्र काल चंद्रकांत पाटलांनी आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव हवा आहे, असं म्हणत अजित पवारांच्या विरोधकांना मुद्दा दिलाय.
चंद्रकांत पाटलांच्या या विधानावरुन शरद पवार गटाचे प्रशांत जगतापांनी अजित पवारांचाच व्हिडीओ ट्विट करुन चंद्रकांत पाटलांना उत्तर दिलंय. चंद्रकांत पाटलांच्या टिकेवेळी रुपाली चाकणकरांच्या हास्यमुद्रेवरुनही राष्ट्रवादीच्या इन्स्टा खात्यावरुन त्यांचाही व्हिडीओ व्हायरल झालाय. अजितदादा म्हणतायत की आम्ही विकासासाठी भाजपात गेलो., मात्र अजित पवार सत्तेत आल्यानंतर त्यांच्याशी राजकीय मैत्री केल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. काल चंद्रकांत पाटलांनी त्याच राजकीय मैत्रीला पुष्ठी करणारी आकडेवारी सांगितली.
अजित पवार भाजपसोबत गेल्याच्या नंतर भिवंडीत भाजपचा कार्यक्रम झाला होता. त्यात कुणाचंही नाव न घेता महाविजयाकरिता कडू औषध घेण्याची तयारी ठेवा असं फडणवीसांनी म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांचं कौतूक करणारे विजय शिवतारेंनी अचानक अजित पवारांविरोधात भूमिका का घेतली. हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांना लिहिलेलं पत्र माध्यमांमध्ये सार्वजनिक का केलं. असे अनेक प्रश्न बारामतीत चर्चेत आहेत.
विशेष म्हणजे काल शिवतारेंनी अजित पवारांवर जहरी टीका केली. मात्र अजितदादा गटाचे काही प्रवक्ते सोडल्यास धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, छगन भुजबळ सारख्या बड्या नेत्यांपैकी काही नेते मौन तर काहींनी मवाळ प्रतिक्रिया दिल्या आहेत. बारामतीची लढाई अजित पवार विरुद्ध शरद पवारांमध्ये आहेच. मात्र महायुतीतही हा सुप्त संघर्ष सुरु नाहीय ना. या प्रश्नाकडेही गेल्या काही दिवसातल्या घडामोडी बोट दाखवतायत.