Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? व्हायरल ऑडिओ क्लिप चर्चेत
शरद पवार गटाची साथ सोडून अजित पवार गटात गेलेले रविकांत राठोडांनी आपली उमेदवारी पंकजा मुंडेंच्या सांगण्यावरुन मागे घेतल्याची चर्चा आहे. त्यावरुन एक कथित ऑडिओ क्लिप बीड लोकसभेत व्हायरल होतेय. यावरील टीव्ही 9 मराठीचा पाहा स्पेशल रिपोर्ट.
बीड लोकसभेत पंकजा मुंडेंनी महामंडळाचं आश्वासन दिल्यानंतर अपक्ष रविकांत राठोडांनी उमेदवारी मागे घेतल्याचं बोललं जातंय. दोघांमधल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली. मात्र संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल करुन फसवणूक झाल्याची चर्चा रविकांत राठोड समर्थकांमध्ये आहे. बीड लोकसभेत भाजपकडून पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणेंमध्ये मुख्य लढत आहे. त्यात बंजारा समाजाच्या रविकांत राठोडांनीही अपक्ष अर्ज भरला होता.
बीड लोकसभेत बंजारा समाजाचं लाख-सव्वा लाख मतदान आहे. त्यापैकी राठोड जितकं मतदान घेतील.तितका पंकजा मुंडेंना तोटा होण्याचा अंदाज होता., त्यामुळेच पंकजा मुंडेंनी दिलेल्या आश्वासनानंतर रविकांत राठोड अर्ज मागे घेण्यास तयार झाल्याचं ऑडिओ क्लिपमधून दिसतंय. मात्र माध्यमांसमोर आपण पोहरागडाच्या आदेशानं माघार घेतल्याचा दावा रविकांत राठोडांचा आहे.
रविकांत राठोड यांची स्वतःची बंजारा ब्रिगेड नावाची संस्था आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात मनसेतून झाली. 2019 ला वंचितमध्ये प्रवेश करुन ते स्टार प्रचारक बनले. 2022 ला संजय राठोड शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यामुळे रविकांत राठोडांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर 4 महिन्यांपूर्वी राठोड शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले.
शरद पवारांनी राठोडांना प्रदेश सरचिटणीस पद दिलं. मात्र बजरंग सोनवणेंना लोकसभेचं तिकीट मिळाल्यामुळे राठोडांनीही अपक्ष अर्ज भरला नंतर कथितपणे पंकजा मुंडेंनी महामंडळाचं आश्वासन दिल्यानं त्यांनी उमेदवारी मागे घेतली आणि थेट भाजपात प्रवेश करण्याऐवजी राठोडांनी अजित पवार गटात प्रवेश केला. सध्या राठोडांना अजित पवार गटात व्हीजेएनटी सेलचं पद मिळालंय. तूर्तास दोन्ही बाजूनं व्हायरल ऑडिओ क्लिपसंदर्भात प्रतिक्रिया मिळालेली नाही.