Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2 वर्षात पहिल्यांदाच ठाकरे आणि फडणवीस इतक्या जवळ, पाहा Video
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकाच लिफ्टमध्ये आले. त्यावरुन पुन्हा उलटसुलट चर्चा सुरु झाल्यात विधानभवनात नेमकं काय घडलं जाणून घ्या.
गेल्या 2 वर्षात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस इतक्या जवळ आले असती. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘लिफ्ट’ निमित्त ठरली. आणि काही मिनिटांचा का होईना ठाकरे फडणवीसांमध्ये संवाद झाला. सभागृहात जाण्यासाठी उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकाचवेळी लिफ्ट जवळ आले. लिफ्ट येईपर्यंत उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये सभागृहाच्या कामकाजावरुन हलका फुलका संवाद झाला. तितक्यात लिफ्ट आली, लिफ्टमध्ये आधीच चौघे जण होते, दोघे जण बाहेर पडले आणि मंत्री छगन भुजबळ, भाजपचे नेते प्रवीण दरेकर लिफ्टच्या आतच राहिले दरेकरांना पाहून याला पहिले बाहेर काढा म्हणत उद्धव ठाकरेंनी चिमटा काढला. त्यावर दरेकरांनी माझं ओठावर एक आणि पोटात एक नसतं असं म्हणत मिश्किल टोला लगावला. त्यातच लिफ्ट बंद होवून दुसऱ्या मजल्यावर येताच फडणवीस एका दिशेनं आणि उद्धव ठाकरे दुसऱ्या दिशेनं निघाले.
थोड्याच वेळात ठाकरेंनी लिफ्टच्या बाहेर राहिलेल्यांनी विचार करावा असं म्हणत, चर्चांना उधाण आणलं. मात्र पत्रकार परिषदेत, भाजपवरुन वेगळे अर्थ काढू नका म्हणत लिफ्ट जवळील भेटीला योगायोग म्हटलं…ना ना करते प्यार तुम्ही से असं होणार नाही असं सांगून उद्धव ठाकरेंनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मुनगंटीवारांनी पुन्हा राजकीय मैत्री वगैरे काही नाही म्हणत, चर्चा फेटाळल्या..पण अनिल परबांनी सूचक वक्तव्यानं चर्चेला हवा दिली. भाजपच्या चंद्रकांत पाटलांनीही 4 भावंडं वेगळी झालीत म्हणजे प्रेम संपत नाही असं वक्तव्य करुन परबांच्या वक्तव्याला बळ दिलं.
पाहा व्हिडीओ:-
काँग्रेसच्या कैलाश गोरंट्याल यांनी मात्र आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिलीय. उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर त्यांचा अजित पवार होईल असं गोरंट्याल म्हणालेत. ज्या लिफ्टमधून ठाकरे आणि फडणवीस एकत्र गेले. त्या लिफ्टमध्ये दरेकरही होते. याला काढा म्हणत ठाकरेंनी त्यांना टोलाही लगावला. आता दरेकरांचं त्यावर काय म्हणणंय, तेही ऐका. बरं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे आणि फडणवीसच अशा प्रकारे एकत्र आले असं नाही. तर, संसदीय मंत्री चंद्रकांत पाटलांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या दालनात, चंद्रकांत पाटलांनी दानवेंना आणि उद्धव ठाकरेंना बुके देवून स्वागत केलं. त्याचवेळी ठाकरेंना चॉकलेटही दिलं. त्यानंतर दानवेंनीही चॉकलेट मागून हशा पिकवला.
मात्र या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी चॉकलेट वरुन चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. ठाकरे आणि दानवेंच्या भेटी दरम्यान अनिल परबही उपस्थित होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत परब उमेदवार आहेत. त्यांना पेढा भरवताना चंद्रकांत पाटलांनी अॅडव्हान्समध्ये शुभेच्छा देत असल्याचंही म्हटलं. पण काही वेळात दादांनी यू टर्न घेतला आणि परबांना अॅडव्हान्स शुभेच्छा दिल्याच नाहीत..आपण अधिवेशनाच्या शुभेच्छा असल्याचं म्हटलं. भाजप विशेषत: फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमधील संबंध प्रचंड ताणले गेलेत. आता लिफ्टच्या टायमिंगमुळं दोघेही काही मिनिटं एकत्र आले. पण जुन्या युतीसाठी आपल्याकडून लिफ्ट मिळणार नाही, हे ठाकरेंनी स्पष्ट केलंय.