Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस आणि शरद पवारांवर दबाव?, पाहा Video
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा पहिला मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांसमोर मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा घोषित करण्याची मागणी केली .कोणताही चेहरा जाहीर करा पाठींबा देणार, असं ठाकरे म्हणालेत. त्यामुळं ठाकरेंनी दबाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.
महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांवर मुख्यमंत्रिपदावरुन एक प्रकारे दबावच टाकला. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधीच जाहीर करा. काँग्रेस आणि शरद पवारांनी ठरवावं आपला पाठींबा असेल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. उद्धव ठाकरेंच्या मागणीला नाना पटोलेंनी उत्तर दिलं.आधी महायुतीचं सरकार घालवायचंय, मुख्यमंत्री कोण होणार हे नेते ठरवतील असं पटोले म्हणालेत. पण पटोलेंनंतर शरद पवारांचं भाषण झालं. पवारांनी मात्र आपल्या भाषणात, मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. गेल्या आठवड्यातच उद्धव ठाकरे, दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडला भेटलेत.
विधानसभा निवडणुका आणि मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरुन ठाकरेंचा हा दौरा होता, हे वेगळं सांगायची गरज नाही. ठाकरे दिल्लीहून परतल्यानंतर, पृथ्वीराज चव्हाणांनी ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं म्हटलं होतं. त्या वक्तव्याला शरद पवारांनी दुजोरा दिला होता. मात्र पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांच्या मताशी सहमत नाहीत, हेच उद्धव ठाकरेंनी सार्वजनिक केलं.
पाहा व्हिडीओ:-
जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरला तर अंतर्गत पाडापाडी होईल, असं उद्धव ठाकरेंचं म्हणणंय. 2019च्या निकालानंतरच युती आणि आघाडीचं समीकरणच बदललं. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आता पुन्हा ठाकरे टू सरकार येणार, असं संजय राऊत उघडपणे सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीत 48 पैकी ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वाधिक 21 जागा लढल्या. त्यापैकी 9 खासदार आलेकाँग्रेसनं 17 जागा लढवून 13 खासदार निवडून आणले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट अधिक आहे, 10 पैकी 8 जागा जिंकल्या.
उद्धव ठाकरेंनी आधीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली. तर सुप्रिया सुळेंनी जागा वाटप आणि तिकीटं लवकरच घोषित करण्याचं आवाहन केलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा मुंबईत पहिला मेळावा झालाय. उद्धव ठाकरेंना प्रचार प्रमुख करणार ही बातमी एक दिवसाआधीच आली होती. मात्र मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण ?, याचा फैसला आधी करा, असं उद्धव ठाकरेंचं म्हणणंय. त्यावर काँग्रेसकडून पटोलेंनी हायकमांड ठरवेल असं म्हटलंय.पण शरद पवारांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.