Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | वसंत मोरे यांनी राज ठाकरेंना का सोडलं? मनसे नेत्याकडून बुटाचा फोटो पोस्ट
मनसेचे डॅशिंग, आक्रमक नेते आणि कधी काळी राज ठाकरे यांचे खास अशी ओळख असलेले पुणेकरांचे तात्या अर्थात वसंत मोरेंनी मनसेला अखेरचा रामराम केला. पक्षांतर्गत होणाऱ्या कुरघोड्यांना कंटाळून आपण मनसेतून बाहेर पडत असल्याचं जाहीर करताना वसंत मोरेंना अश्रू अनावर झाले.
मुंबई : वसंत मोरे पुण्यातून लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत. आपली इच्छा त्यांनी राज ठाकरेपर्यंत बोलूनही दाखवली. मात्र पुण्यातल्या कार्यकारिणीतल्याच नेत्यांनी कटकारस्थान करुन निगेटिव्ह अहवाल राज ठाकरेंपर्यंत पोहोचवला. बोलण्यासाठी वेळ मागूनही राज ठाकरेंनी वेळ दिली नाही अशी खंतही मोरेंनी बोलवून दाखवली.
वसंत मोरे मनसेत राहणार नाहीत हे सकाळीच त्यांच्या फेसबुक पोस्टवरुन निश्चित झालं होतं. एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यावर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो. ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. त्यानंतर ट्विटरवरुन कार्यालयातील राज ठाकरेंच्या फोटोसमोर साष्टांग दडवंत घालणारा फोटो ट्विट करुन, अखेरचा जय महाराष्ट्र. साहेब मला माफ करा असं म्हणून मनसेतून राजीनामा जाहीर केला. मोरे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. पण गेल्याच महिन्यात पुण्यात येऊन शर्मिला ठाकरेंनी शहराध्यक्ष साईनाथ बाबरांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते.
आता वसंत मोरे, 2-3 दिवसांत पुढचा राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत. त्यासंदर्भात पुणेकरांना विचारणार आणि एकटा लढणार असा निर्धार मोरेंनी केलाय. तर मोरेंच्या मनसेतल्या एकेकाळच्या जुन्या सहकारी आणि सध्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी मोरेंनी राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिलीय. मुंबईतल्या मनसेच्या एकाही नेत्यांनं मोरेंवर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ठाण्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांनी नाव घेता फेसबूक राज ठाकरेंच्या बुटाचा फोटो पोस्ट केलाय.
एक राजा रोज हत्तीवरून राज्यात फेरफटका मारायचा. तेव्हा प्रत्येक चौकात राजाचं औक्षण केलं जायचं, आरती ओवाळली जायची, धुमधड्याक्यात स्वागत केलं जायचं. तेव्हा त्या हत्तीला वाटायचं औक्षण-आरती, आपलीच केली जात आहे. त्याला कळत नव्हतं ही राजाची पुण्याई आहे. राजामुळे त्याला हा मान मिळत आहे. काही दिवसांआधीच वसंत मोरेंनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट घेतली होती. पण तेव्हापासूनच मोरेंची पावलं, शरद पवार गटाच्या दिशेनं आहेत का? अशी चर्चा सुरु झाली होती.
पाहा व्हिडीओ:-
गेल्या 3 वर्षांपासून वसंत मोरे मनसेत नाराज होते. वेळोवेळी आपली नाराजी त्यांनी बोलूनही दाखवली. पण राज ठाकरेंनीही नाराजी दखल न घेतल्यानं अखेर मोरे मनसेपासून वेगळे झालेत..आणि नवा मार्ग शोधणार आहेत. मात्र वसंत मोरेंवर पुण्यातल्या एकाही मनसेच्या नेत्यांची प्रतिक्रिया आलेली नाही