Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट | गडचिरोलीचा पालकमंत्री असताना माझी…. एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप!
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचा समाचार घेतला. पण त्याचवेळी शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय.
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलंय आणि या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार बॅटिंग केली. शिंदेंचा रोख अर्थात उद्धव ठाकरेंवरच होता. गेल्या काही दिवसांमधल्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरुन शिंदेंनी टीकास्त्र सोडलंय.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचा समाचार घेतला. पण त्याचवेळी शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय. गडचिरोलीचा पालकमंत्री असताना माझी झेड प्लस सुरक्षा उद्धव ठाकरेंनीच रोखली, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय.
गेल्या काही पत्रकार परिषदा असो की सभा, उद्धव ठाकरेंनी अमित शाहांचा उल्लेख मोगॅम्बो असा केलाय. पण बाळासाहेब असते तर अमित शाहांना मिस्टर इंडिया म्हटलं असतं असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केलाय. तसंच माहीममधील बेकायदेशीर मजारीवर केलेल्या कारवाई वरुनही शिंदेंनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ शिंदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही उत्तर दिलंय. कोट्यवधी खर्चून मुंबईत रोषणाई सुरु आहे. ती कायम स्वरुपी राहणार आहे का?, असा सवाल राज ठाकरेंनी केला होता.
एकनाथ शिंदेंनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनाही उत्तर दिलंय..पटोले सरकार पडणार म्हणायचे पण दुसऱ्याच दिवशी सही घ्यायलाही यायचे, असा चिमटाही शिंदेंनी काढलाय. इकडे संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा डिवचलंय. शिंदेंनी स्वत:चा पक्ष काढून 5 आमदार निवडून दाखवा, असं आव्हान राऊतांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. अधिवेशन संपलंय..पण याकाळात शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटामध्येच अधिक चकमक झाल्याचं दिसलं.