Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | अजित पवार हे शरद पवारांबाबत असं काय म्हणाले त्यावर आव्हाड बोलले, आम्हाला लाज वाटते
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून शरद पवार गट आक्रमक झाला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आम्हाला तुमच्यासोबत काम केलं याची लाज वाटत असल्याचं म्हणत अजित पवारांवर निशाणा साधला.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका विधानानं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात घमासान रंगलंय. नेमकं काय म्हणाले अजित पवार आणि त्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी काय टीका केली. बारामतीत काही जण तुम्हाला भावनिक करतील शेवटची निवडणूक आहे म्हणून सांगतील. मात्र त्यांची खरंच शेवटची निवडणूक कधी येईल, हे माहिती नाही. या अजित पवारांच्या विधानावर शरद पवारांचा गट आक्रमक झालाय.
पाहा व्हिडीओ:-
ज्या पवारांनी तुम्हाला मोठं केलं, त्यांचंच मरण चिंतत आहात म्हणून आव्हाडांनी टीका केलीय. दुष्मणाचाही बाप मरू नये असे म्हणणारे आम्ही आणि अजित पवारांनी तर सर्व हद्द ओलांडली. बारामतीत लहान पोरांनाही माहीत आहे ही बारामती कोणी नांगरली तिची मशागत केली, आणि कोणी कुणाच्या हातात दिली. तिथं भावनिक आवाहन करतील तर नाही त्या ठिकाणी बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील. लाज वाटतेय आम्हाला तुमच्याबरोबर काम केल्याची, मला तर आधी पासूनच वाटायची, आव्हाड म्हणाले.
बारामतीत उमेदवार कोण असेल यावरुन अजित पवारांनी मी समजून मतदान करा, असं आवाहन केलं. याचवेळी एक व्यक्ती मंचावर येवून त्यानं सुनेत्रा पवारांना संधी देण्याचं आवाहन केलं. मात्र विसंगती म्हणजे अजित पवार एकीकडे भावनिक होऊ नका म्हणून विनंतही करतायत आणि दुसऱ्याच वाक्यात विकासकामांवरुन इशारावजा विधानंही करतायत.
दरम्यान, विशेष म्हणजे काही लोकांना आपण पदं दिली. तरीही त्यांनी वेगळी भूमिका घेतली. ज्यांना करोडोंची जागा नाममात्र दरानं दिली. त्यांचंही काम आता जोरात चाललंय, असंही अजित पवारांनी जाहीरपणे सांगून टाकलं. बारामतीत अजित पवार एकीकडे कामांचा दाखला देत आहेत. दुसरीकडे लोकांना भावनिक न होण्याची विनंती करतायत. त्याचबरोबर साथ नाही दिली तर ती कामं होणार नाहीत, असंही स्पष्टपणे सांगतायत.