Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : “पुणे अपघात प्रकरणात अजित पवार यांची नार्को टेस्ट करावी”, कोणी केली मागणी?
पुणे अपघातावरुन पोलीस अधिकारी निलंबित झाले...ससून रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक झाली. आता अजित पवारांच्या नार्को टेस्टची मागणी झालीय. आरोपीला मदत केल्याचा आरोप करत, अंजली दमानियांनी अजित पवारांची नार्को टेस्ट करा, असं म्हटलंय.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी, पुणे अपघात प्रकरणात अजित पवारांची नार्को टेस्ट अर्थात ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी केली. अजित पवारांचा फोन जप्त करुन नार्को टेस्ट करा, असं अंजली दमानियांचं म्हणणंय. सत्य जाणून घेण्यासाठी नार्को टेस्ट केली जाते. फॉरेन्सिक तज्ञ, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञांच्या उपस्थितीत नार्को टेस्ट होते. नार्को टेस्टमध्ये सोडियम पेंटोथॉल नावाचं इंजेक्शन दिलं जातेनार्को टेस्टमध्ये व्यक्ती ना पूर्णपणे शुद्धीत असो ना बेशुद्ध असतो. विचार करण्याची क्षमता कमी होते आणि तो खरं बोलायला लागतो असा समज आहे. पण कोणाचीही नार्को टेस्ट होत नाही त्यासाठी कोर्टाची परवानगी लागते.
पोर्षे कारने अल्पवयीन आरोपीनं दोघांना चिरडल्यानंतर. कशाप्रकारे आधी पोलिसांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. नंतर ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी 3 लाखांत ब्लड सॅम्पल बदलल्याचंही समोर आलं. त्याच दरम्यान अजित पवारांचे आमदार सुनिल टिंगरेही येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आल्याचं पोलीस आयुक्तांनीच सांगितलं. अर्थात आपण कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, असं टिंगरेंनी सांगितलं. तर, आरोपीला वाचवण्याच्या षडयंत्राचे सूत्रधार अजित पवारच असल्याचा सनसनाटी आरोप दमानियांचा आहे.
आरोपीला वाचवण्यासाठी पालकमंत्री अजित पवारांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना फोन केला, असा आरोप दमानियांचा आहे. तर माहिती मिळाल्यावर पालकमंत्री म्हणून आयुक्तांनाच फोन करणार असं अजित पवार म्हणाले. दोघांचा जीव घेतल्यावरही अल्पवयीन दारुड्या पोराला वाचवण्यासाठी बिल्डर विशाल अग्रवालनं, पैशाच्या जोरावर ब्लॅड सॅम्पलच बदलले. ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. डॉ. श्रीहरी हळनोर सध्या पोलीस कोठडीत आहेत…त्यावरुन 3 सदस्यीय समिती स्थापन झाली. मात्र समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळेंवरच भ्रष्टाचाराचे आरोप असून, त्यांना हटवण्याची मागणी सुषमा अंधारेंनी केलीय.
पाहा व्हिडीओ:-
माझी नियुक्ती सरकारनं केलीय. त्यामुळं माझ्यावरील आरोपांबद्दल सरकारलाच विचारा असं डॉ. पल्लवी सापळेंचं म्हणणंय. तर ससून रुग्णालयात येवून त्यांनी चौकशीला सुरुवात केलीय.ब्लड सॅम्पल बदलण्यामागे फक्त डॉ. अजय तावरे आणि डॉ. डॉ. श्रीहरी हळनोरच आहेत का? 3 लाखच घेतले की आणखी मोठा आर्थिक व्यवहार आहे? कोणाच्या सांगण्यावरुन ब्लड सॅम्पल बदलले ?पॉलिटिकल कनेक्शन आहे का ? असे अनेक प्रश्न पुणेकर विचारतायत.
डॉ. अजय तावरेंच्याच सांगण्यावरुन डॉ. हळनोरनं आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचं पोलिसांचं म्हणणंय. तर तावरेंच्या नातेवाईकांनी आरोप फेटाळलेत. पुण्याच्या अपघातावरुन एक बाब स्पष्ट झाली की, लाच आणि भ्रष्टाचाराचे धागेदोरे फार खोलवर गेलेत आणि आरोप पोलिसांपासून ते आमदार आणि आता अजित पवारांपर्यंत होत आहेत.