Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | महायुतीचा ‘या’ पाच जागा सोडून फॉर्मुला ठरला? पाहा व्हिडीओ
दिल्लीत अमित शाहांच्या घरी रात्री अडीच तास बैठक झाली. या बैठकीत महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये एक एक जागेवरुन चर्चा झाली. विजयाच्या मेरिटवरच जागा आणि उमेदवार देणार यावर अमित शाह ठाम आहेत. शिंदे गटाचे काही उमेदवार बदलण्याची सूचनाही शाहांनी केल्याचं कळतंय.
मुंबई : दिल्लीत काल रात्री अडीच तास केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक झाली. या बैठकीत काही जागांची अदलाबदल करण्याबरोबरच 5 जागा सोडून फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. आता 11 तारखेच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांना 4 जागा देण्यावर जवळपास निश्चित झालं असून मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला 10 जागा देण्याची तयारी भाजपनं केलीय. म्हणजेच फॉर्म्युल्याचा विचार केल्यास भाजप 34 जागा लढण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेला 10 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळू शकतात अर्थात आणखी एक बैठक होणार असून 11 तारखेला पुन्हा शिंदे फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत अमित शाहांसमोर एकत्र येतील.
पाहा व्हिडीओ:-
80 टक्के जागा वाटपाचं काम पूर्ण झाल्याचं फडणवीस म्हणालेत. आणि 20 टक्क्यांवर जो तोडगा निघालेला नाही. तो तिढा शिंदेंच्या शिवसेनेकडील 5 जागांचा आहे. वाशिम-यवतमाळमध्ये शिंदे गटाच्या भावना गवळी खासदार आहेत. रामटेकमध्ये कृपाल तुमाने खासदार आहेत. मावळमध्ये श्रीरंग बारणे खासदार आहेत. कोल्हापुरातून संजय मंडलिक खासदार आहेत आणि पालघरमध्ये राजेंद्र गावित खासदार आहेत. 2019मध्ये उमेदवारासह भाजपनं ही जागा शिवसेनेला सोडली होती. या 5 जागांपैकी काही जागांवर उमेदवार बदला किंवा भाजपला द्या असं भाजपच्या हायकमांडचं म्हणणंय.
अजित पवारांनी याआधी 4 जागा आपण लढणार असल्याची घोषणा जाहीरपणे केली होती. 4 जागा दादांना देण्यास भाजपनं तयारी दर्शवलीय. दादांनी जाहीर मेळाव्यात बारामती, सातारा, रायगड आणि शिरुर या जागा लढणार असल्याचं म्हटलं होतं. पण या पैकी साताऱ्याची जागा देण्यास भाजपचा विरोध आहे.साताऱ्या ऐवजी, परभणीची जागा अजित पवारांना मिळण्याची शक्यता आहे. कारण 2019 मध्ये ही जागा शिवसेनेनं लढवली होती आणि खासदार संजय जाधव ठाकरे गटात आहेत.
दुसऱ्या नंबरवर राहिलेले राजेश विटेकरांनी तब्बल 4 लाख 96 हजार मतं घेतली होती. आणि 42 हजारांनी पराभव झाला होता. विटेकर सध्या अजित पवार गटातच आहेत. त्यामुळं परभणीची जागा देऊन भाजप अजित पवारांची 4 जागांची घोषणा पूर्ण करु शकते. दुसरीकडे संजय राऊतांनी, शिंदे आणि अजित पवारांवर जळजळीत टीका केलीय. दिल्लीत जावून व्यापाऱ्यांची भांडी घासत असून 4-5 जागांचं हाडून फेकण्यात आल्याची टीका राऊतांनी केलीय.
भाजपनं देशभरातल्या उमेदवारीची पहिली यादी जाहीर केलीय. आता 11 तारखेला भाजपच्या निवडणूक समितीची बैठक आहे. 12 तारखेला भाजपची दुसरी यादी जाहीर होईल. त्यामुळं 11 तारखेला महायुतीकडून पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाची अधिकृत घोषणा होऊ शकते.