ट्विट करत उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना डिवचलं, उर्फी ट्विवटमध्ये म्हणते, मी आणि चित्रू…
मंगेश मोहिते, राहुल शेवाळे आणि श्रीकांत देशमुख या तिघांनी महिलांवर अन्याय केले आहेत. त्यांची तक्रार चित्रा वाघ यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करावी.
मुंबई : मॉडेल उर्फी जावेदनं ट्विट करत भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यास मी आणि चित्रू चांगल्या मैत्रिणी होणार, असं ट्विट करत उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे. उर्फी जावेद म्हणते, लवकरचं मी आणि चित्रू चांगल्या मैत्रिणी होणार आहोत. चित्रा वाघ यांच्या विरोधात वारंवार ट्विट समोर येत आहेत. उर्फी जावेदवरून चित्रा वाघ महिला आयोगाविरोधात आक्रमक झाल्या आहेत. महिला आयोगानं स्वतःहून दखल घेऊन जाब का विचारला नाही, असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय.
महिला आयोग उर्फी जावेदचं समर्थन करते का, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, महिला आयोगाची भाषा नकोय, तर कृती हवी आहे. सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात उघडनागडं फिरणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का, असा सवालही वाघ यांनी केलाय.
उर्फी जावेद अतिशय विभत्सपणे रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी फिरते. महिला आयोगानं याचा जाब का विचारला नाही. महिला आयोगाची काल भूमिका मांडण्यात आली. उर्फी जावेदच्या उघड्यानागड्या फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का. छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा महाराष्ट्र आहे. उघडनागडं सार्वजनिक ठिकाणी फिरणं ही आमची संस्कृती नाही, असंही चित्रा वाघ यांनी सुनावलं.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयोग अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतंय. महिला आयोगानं काय करावं हे कुणाला सांगण्याची काही गरज नाही. कोणी काय घालावं. कोणी काय घालू नये, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे.
मंगेश मोहिते, राहुल शेवाळे आणि श्रीकांत देशमुख या तिघांनी महिलांवर अन्याय केले आहेत. त्यांची तक्रार चित्रा वाघ यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करावी. तिन्ही पीडितांना न्याय देण्यासाठी केंद्राकडं मदत मागतील, अशी माझ्या अपेक्षा असल्याचंही रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.