Aditya Thackeray | “मला गद्दारांच्या शिव्यांचं टॉनिक या आठवड्यात मिळालं नाही”, आदित्य ठाकरे असं का म्हणाले?
आमदार आदित्य ठाकरे यांची रविवारी गोरेगाव येथे शिवगर्जना सभा पार पडली. या सभेदरम्यान युवासेनाप्रमुख यांनी शिंदे गटावर घणाघात केला.
मुंबई | महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आदित्य ठाकरे चांगलेच सक्रीय झाले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर आदित्य ठाकरे आणि पर्यायाने संपूर्ण ठाकरे गटाला संघर्ष करावा लागतोय. आपल्या गटाला नव्याने उभारी देण्यासाठी ठाकरे गटातील नेते आणि स्वत: आदित्य ठाकरे हे विविध यात्रांच्या माध्यमातून जिल्ह्याजिल्ह्यात जात आहेत. आता शिवगर्जना सभांचं आयोजन करण्यात आलंय. या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांवर घणाघात केला आहे. ही दुसरी शिवसेना नाहीच, जे आहेत ते चोर आहेत, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“आज येथे येत असताना सहज विचार करत होतो की बोलायचं कशावर? आता अधिवेशन सुरु आहे. अनेक मुद्दे समोर येत आहेत. अनेक घोटाळे काढण्याचा प्रयत्न होत आहे. जे काही गैरव्यवहार आणि भोंगळ कारभार सुरु आहे, त्यावर आम्ही बोलत असतो. पण मला गेली 6-7 महिने सवय झाली आहे. रोज सकाळी उठून गद्दरांकडून शिव्या ऐकायच्या, पण या महिन्यात मला काही ते टॉनिक मिळालेलं नाही. मग मला कळलं की त्यांच्या त्यांच्यातच वाद सुरु झाल्याचं समजलं. भाजप आणि गद्दारांमध्ये, गद्दारांमध्ये आणि भाजपमध्ये वाद सुरु आहेत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ते गोरगाव येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणात आयोजित करण्यात आलेल्या शिवगर्जना सभेत होत होते.
“दुसरी शिवसेना नाहीच”
” जे राज्य इतकं चांगलं काम करत होतं. गेल्या अडीच महाविकास आघाडीचं काम असेल, मग त्यात शिवसेना आहेच. मी शिवसेनाच म्हणणार कारण जे दुसरी शिवसेना नाहीच, जे आहेत ते चोर-गद्दार आहेत आणि तसेच राहणार”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी हल्ला चढवला.
निवडणूक आयोगावर टीका
“निवडणूक आयोगाला ईसी म्हणतात, इसी म्हणजे काय, entire comprmise. या निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय दिला असेल तरी तो आपल्या लोकशाहीसाठी, देशासाठी घातक आहे. शिवसेना ही एकच आहे, ती म्हणजे माझ्या समोर आणि सोबत बसलेले तुम्ही सर्व”, असं आदित्य ठाकरे सभेला उपस्थित असणाऱ्यांकडून हात दाखवून म्हणाले.