उद्धव ठाकरे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, मुंबईच्या रुग्णालयात उपचार
उद्धव ठाकरे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात अॅन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात अॅन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उद्धव ठाकरे स्वत:चं मेडीकल रुटीन चेकअप करण्यासाठी मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये सकाळी आठ वाजता दाखल झाले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची रुटीन चेकअप केली त्यावेळेस त्यांच्या रक्त वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अॅन्जिओप्लास्टीचा सल्ला दिला. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये सुद्धा अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आले होते. पण आता थोड्या वेळापूर्वी त्यांच्यावर सुखरुप अॅन्जिओप्लास्टी झालेली आहे.
उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून अतिशय आक्रमकपणे फिरताना आणि प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. त्यातच त्यांना मेडिकल रुटीन चेकअप करत असताना ब्लॉकेज आढलून आल्यामुळे डॉक्टरांनी अॅन्जिओप्लास्टीचा सल्ला दिला. त्यानुसार अॅन्जिओप्लास्टी झाली आहे. तसेच थोड्याच वेळाने उद्धव ठाकरे यांना एचएन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार असल्याची देखील माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.
उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. “आज सकाळी, उद्धव ठाकरे सर एचएन रिलायन्स रुग्णालयात पूर्व नियोजित तपासणीसाठी दाखल झाले आहेत. तुमच्या शुभेच्छासह सर्व काही ठीक आहे, पुन्हा कार्यरत होण्यासाठी आणि तुमच्यासेवेसाठी पूर्णपणे तयार आहेत”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे अनेक दिवसांपासून कामात व्यस्त
उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. तसेच ते राज्यातील विविध भागांचा दौरा करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे प्रचंड कामात व्यस्त आहेत. राज्यात विधानसभेची निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे रणनीती आखत आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांना मणक्याचादेखील त्रास होता. त्यामुळे त्यांच्यावर दोन वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर आता त्यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी झाली आहे.
दसऱ्या मेळाव्यात शिंदेंवर साधला निशाणा
उद्धव ठाकरे यांनी नुकतंच दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेच्या दोन्ही गटांचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं. या मेळव्यातून उद्धव ठाकरे काय बोलतात? याकडे अनेकांचं लक्ष होतं. उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात एकनाथ शिंदे आणि भाजपवर सडकून टीका केली. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीदेखील उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.