जिंकण्यासाठीच मैदानात उतरू, निवडणुकीची तयारी करा, उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना पुन्हा आदेश
निवडणुकीच्या कामांची तयारी करताना एकमेकांशी समन्वय साधा. एक दिलाने काम करा. काही अडचणी आल्यातर वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधा.
मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणुका, महापालिका आणि सिनेटच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. एकमेकांशी समन्वय साधून काम करा. आपल्याला जिंकण्यासाठीच मैदानात उतरायचं आहे, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आज दिले. शिवसेना भवनात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले आहेत. यावेळी आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, नगरसेवक आणि विधानसभेचे पराभूत उमदेवारही उपस्थित होते.
या बैठकीनंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी संवाद साधला. सर्वच राजकीय पक्षांच्या निवडणुकीच्या तयारीच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही या संदर्भात बैठक घेतली असून निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. सिनेटपासून ते इतर सर्व निवडणुकीत कसे काम करायचे याचे मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागवार बैठका घेतल्या जात आहेत. त्यामुळे ही बैठक झाली. उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांनीही मार्गदर्शन केलं. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काही गोष्टींचं मार्गदर्शन करण्यात आलं. महापालिका आपल्याकडेच राहणार आहे. त्यामुळे जिंकण्यासाठीच आपण मैदानात उतरू, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं त्या म्हणाल्या.
निवडणुकीच्या कामांची तयारी करताना एकमेकांशी समन्वय साधा. एक दिलाने काम करा. काही अडचणी आल्यातर वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधा. गाफील राहू नका, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच वॉर्ड पुनर्ररचनेचं टेन्शन घेऊ नका. ज्याची सत्ता आहे, ते वॉर्ड पुनर्रचना करणारच. पण तुम्ही कामाला लागा, असं त्यांनी सांगितल्याचंही त्या म्हणाल्या.
दिशा सालियनचा मृत्यू अपघाती होता असं सीबीआयच्या तपासातून निष्पन्न झालं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्यमेव जयते. या प्रकरणामुळे कुटुंबीयांना किती मनस्ताप झाला हे लक्षात घ्या. केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. विनाकारण त्यांना बदनाम केले. षडयंत्र करणाऱ्यांचा चेहरामोहरा समोर आला आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.