Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी बोलावले तर मातोश्रीवर जाऊ, सतोष बांगर यांचं मोठं विधान, तर किरीट सोमय्या यांनाही इशारा
उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सन्मानाने बोलवलं तर मातोश्रीवर परत जाऊ, आम्हाला मातोश्रीवर परत जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही काही बोलणार नाहीत, असे विधान बांगर यांनी केले.
हिंगोली : किरीट सोमय्या यांच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना माफिया बोलण्याच्या विधानाने शिंदे गट (Eknath Shinde) आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच आता शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Banger) यांनी मोठं विधान केलंय. संतोष बांगर यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी ठाकरे गटाकडून मतदान केलं तर बहुमत चाचणीच्या वेळी संतोष बांगर हे थे एकनाथ शिंदे गटात दिसून आले. मात्र किरीट सोमय्या हे उद्धव ठाकरे यांना माफिया बोलल्यामुळे सर्वच बंडखोर शिवसेना आमदार हे भडकून उठले आहेत. त्यातच संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सन्मानाने बोलवलं तर मातोश्रीवर परत जाऊ, आम्हाला मातोश्रीवर परत जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही काही बोलणार नाहीत, असे विधान बांगर यांनी केले. त्याआधीच बंडखोर आमदारांना अजूनही मातोश्रीचं दारं खुली आहे, माफ करू असे विधान आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. त्यामुळे आता वेगळ्याच राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
बांगर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना आमदार संतोष बांगर म्हणाले, मातोश्रीवर आम्हाला सन्मानपूर्वक बोलवलं तर आम्ही मातोश्रीवर जायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा नकार देणार नाहीत. हे राजकारण आहे. राजकारणात काही होऊ शकतं. मातोश्री वरून मोदीजी यांना फोन केला तर आणि भाजप शिवसेनेची युती पुन्हा झाली तर प्रत्येक शिवसैनिकाला आनंद होईल, असे ते म्हणाले आहेत. आजही आमचा आदर उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहे. मातोश्रीवर आमचं प्रेम अद्याप कायम आहे. जर काही लोक मातोश्रीवर चिखलफेक करत असतील तर आमचे मुख्यमंत्री देखील शांत बसणार नाहीत, असे म्हणत त्यांनी किरीट सोमय्या यांनाही सूचक इशारा दिला आहे. तसेच शिवसैनिक आणि आमदार, पदाधिकारी पेटून उठतील असेही बांगर म्हणाले आहेत.
आम्हीला गटागटात मोजू नका
आम्ही शिवसेनेतच आहोत, शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत म्हणून आम्हाला गटागटात मोजू नका, असे विधान हे बांगर यांनी केले आहे. तसेच बुधवारी 10 ट्रॅव्हल्स घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला मुंबईला जाणार असल्याचेही बांगर यांनी यावेळी सांगितले आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना मी मतदान केले नसते तर मी शिवसैनिक म्हणून घेण्याजोगा नसतो. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठी जबाबदारी देणार आहेत. तसेच आम्हाला नोटीसा आल्या त्याची आम्हाला पर्वा नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही अशा नोटीशींना घाबरत नाही. कोर्ट आणि निवडणूक आयोग देईल, तो निर्णय अंतिम निर्णय असतो, कोणते चिन्ह कोणाला मिळेल हे सध्या सांगता येत नाही, असेही बांगर म्हणाले आहेत.