‘नितीन गडकरी संघाचे निष्ठावंत माणूस पण भाजपच्या यादीत नाव नाही’; उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका
Uddhav Thackeray on Bjp Dharavi Sabha : भाजपने लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही उमेदवाराच्या नावाचा समावेश नाही. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीमध्ये 16 राज्यातील 195 उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे. मात्र महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव घेत धारावीमधील सभेतून भाजपवर निशाणा साधला. संघाचा निष्ठावंत माणूस पण त्यांचं नावं यादीत नसल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
भाजपने यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव भाजपच्या यादीत. मोदी, शाह हे नाव आम्हाला माहीत नव्हतं. आम्हाला प्रमोद महाजन यांनी ओळख करून दिली. महाजन यांच्यासोबत नितीन गडकरी आले. गडकरी यांनी 55 उड्डाणपुलं बांधली. संघाचा निष्ठावंत माणूस आहे, पण त्यांचं नाव यादीत नाही. मुंबईतील कृपाशंकर सिंह यांचं नाव यादीत पण गडकरींचं नाव नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
आठवर्षापूर्वी सव्वा लाख कोटीचं पॅकेज मोदींनी बिहारला जाहीर केलं होतं. त्यापैकी किती पैसे आले, जर आले असतील तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासबत येतो. मोदींचा फसवी फसवीचा खेळ सुरू आहे. आम्हीही दोनदा मोदींच्या भूलथापांना बळी पडलो. पदरात काय पडलं. धोंडे पडले तरी त्यात त्यांना शेंदूर फासून देव करता येतो. हे काय करणार. यांनी फक्त नावं बदललं. योजनांची नावे बदलली. काही काम केलं नाही. जुमल्याचं नाव गॅरंटी ठेवली आहे. भ्रष्टाचार करा. भाजपमध्ये या तुमचं वाकडं होणार नाही, ही मोदी गॅरंटी असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या अब की बार 400 पार यावर बोलताला अब की बार भाजप तडीपार, कसे 400 पार होतो बघतो. गेल्यावेळी महाराष्ट्राने निवडून दिले नसते तर तुम्ही अडीचशेच्या पार गेला नसता, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली.