Uddhav Thackeray : काल माईक खेचला, उद्या काय-काय खेचतील..? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांना टोला
शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेनेने आयोजित केली होती. या महिला पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले.
मुंबई : काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता. सुसाट सुटली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होते, की अपघात तर होणार नाही ना… काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर असलेला माईक आपल्याकडे खेचला, पुढे काय काय खेचतील ते माहीत नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेनेने आयोजित केली होती. या महिला पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. सर्व महिलांनी ताकदीने बंडखोर लोकांच्या समोर जाऊन शिवसेना वाढवू आणि बंडखोरांना गाडू, असा प्रण केला आहे. काही काळ जावा लागतो. त्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वात शिवसेना पुढे जाईल, असे बैठकीनंतर शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
नेमके काय घडले होते?
अधिवेशन संस्थगित झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले होते, की संतोष बांगर कोणत्या पक्षातून तुमच्याकडे आले? त्यावेळीदेखील ते अगदी सहजरित्या कोणत्या म्हणजे शिवसेनेच्या असे म्हणणार, तेवढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या समोरचा माईक काढून घेतला आणि म्हणाले, की ते त्या शिवसेनेतून खऱ्या शिवसेनेत आले आहेत. आतापर्यंत ते चुकीच्या गटात होते. यावेळी काही क्षण एकनाथ शिंदे गोंधळलेले पाहायला मिळाले. मात्र या घटनेवरून या सरकारमध्ये कोणाचे वर्चस्व आहे, हे दिसून येत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याचवरून उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.
पाहा व्हिडिओ –
‘महिलांना राजकारणात 100 टक्के आरक्षण हवे’
महिलांना इथून पुढे राजकारणात 100 टक्के आरक्षण दिले पाहिजे. पुरुषांनी गद्दारी केली, पुरूष फुटले. महिला पाठीशी उभ्या राहिल्या, असे उद्धव ठाकरे गंमतीने यावेळी म्हणाले. महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पुन्हा पक्षाला ताकद मिळवून देणार, असा विश्वास व्यक्त केला.