मुंबई : भाजप फक्त आयारामांचा पक्ष झाला असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केली. रंगशारदा सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, आजसु्द्धा औरंगजेब जीवंत आहे. शिवसेना फोडणारा औरंगजेब जीवंत आहे. राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जीवंत आहे. ही औरंग्याची वृत्ती भाजपमध्ये आहे. अशी वृत्ती महाराष्ट्रामध्ये नाही. महाराष्ट्र हे मराठ्यांचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य आहे.
राज्यातील भगवी ताकद फोडण्याचं काम औरंग्याच्या वृत्तीने केली आहे. औरंगजेब तुमच्यामध्ये दडलेला आहे. आमच्यामध्ये नाही. औरंगजेबाच्या घराणेशाहीचा इतिहास असेल, तर हा भाजपच्या घराणेशाहीचा इतिहास असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
भाजप हे आयारामांचे मंदिर बांधत आहेत. आसाममध्ये आयाराम मुख्यमंत्री बनवले. राज्यात आयाराम मुख्यमंत्री बनवले. ज्यांना फोडायचं त्यांनाच एकमेकांत भिडवायचं अशी यांची कुटनीती आहे. शिवसेना-शिवसेना भांडतील. राष्ट्रवादी काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोकं भांडतील. परस्पर मरतील. माझ्या कपड्यावरती डाग नाही. ज्यांचे कपडे धुऊन पाहिजे असतील आमच्याकडे या, अशी भाजपची नीती असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.
रक्षाबंधन मुस्लीम महिलांकडून करून घ्या, अशा सूचना एनडीएतील खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. पण, मणिपूरमध्ये ज्या महिलांची धिंड काढण्यात आली त्या महिलांकडून बांधून घ्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. मुस्लीम महिलांकडून राखी बांधू घ्यायची असेल, तर मीलकीस बानूकडून बांधून घ्या. बानू गर्भवती असताना तिच्या तीन वर्षांच्या मुलीला मारलं. तिच्या गुन्हेगारांना गुजरात सरकारने सोडलं. हिंमत असेल,तर मीलकीस बानूकडून रक्षाबंधन करून घ्या, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्या घराण्याचा इतिहास आहे. सहा-सात पिढ्या जनसेवा करतात. भाजप उभा राहिला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संपवू शकत नाही. हिंदुत्व हे हिंदुत्वच आहे. ते काही कुणाचं वेगळं नाही. काळानुरूप काही भूमिका घ्याव्या लागतात. प्रबोधनकारांनी घेतल्या. बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्या. आता मी काही भूमिका घेतो. आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदूत्व नाही, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.