Uddhav Thackeray : वादळं आली, पालापाचोळा झडून गेला, पण शिवसेनेची मुळं घट्ट राहतील; एकनाथ शिंदेंसह बंडखोरांना उद्धव ठाकरेंचा इशारा
जे गेले त्यांच्यासोबत एकही सच्चा शिवसैनिक गेला नाही. जिथे सत्ता असते तिथे शिवसैनिक येत नाहीत. तर जिथे शिवसैनिक असतो तिथे सत्ता येते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई : गेली बरेच दिवस अरविंद सावंत (Arvind Sawant) माझ्या मागे लागले होते, की कार्यालयाचे उद्घाटन करायचे आहे. मी दुर्लक्ष करत होतो. पण हल्ली दिवस असे आहेत, की आमदार, खासदार सांगतील ते ऐकावे लागते. हल्ली कोण कुणासोबत हे कळतच नाही. किती वादळे येतील, पाला पाचोळा झडून जाईल. पण शिवसेनेची मुळे अशीच घट्ट राहतील, असा विश्वास शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईत बोलत होते. शिवसेनेच्या काळाचौकी येथील शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, की जे गेले त्यांचा उल्लेख संपूर्ण जग गद्दार असा करत आहे. ते काल म्हणत होते आम्हाला गद्दार म्हणू नका. पण तुमच्या कपाळावरच तुम्ही आता हाताने शिक्का मारून घेतलाय तो बोलतोय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.
‘आता फिरू शकत नाहीत’
जे गेले त्यांच्यासोबत एकही सच्चा शिवसैनिक गेला नाही. जिथे सत्ता असते तिथे शिवसैनिक येत नाहीत. तर जिथे शिवसैनिक असतो तिथे सत्ता येते. जे गेले ते आता शिवसैनिकांच्या अशा गर्दीत मिसळून दाखवू शकतील का? ज्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून, निखारे ठेवून तुम्हाला निवडून दिले, त्यांच्यात हे आता फिरू शकत नाहीत. त्यांना आता पोलीस प्रोटेक्शन लागत आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
‘तेव्हाच एखाद्या दगडाला शेंदूर लागला असता’
2019मध्ये आपले सगळे करार भाजपसोबत ठरले होते, त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली. आपलेही चांगले निवडून आले, भाजपाची तर काय एकहाती सत्ता आली. तेव्हा मंत्रिपद नको म्हणत असताना आपल्या गळ्यात मारले. त्यानंतर पाच सहा महिन्यात विधानसभा निवडणूक लागली. आज ते सांगत आहेत, आम्ही सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. अडीच वर्षापूर्वीच हे झाले असते. आज मनावर दगड ठेवून जे करावे लागले आहे. तेव्हाच भाजपाच्या कोणत्यातरी एखाद्या दगडाला शेंदूर लागला असता ना. आधी 50-50 टक्के ठरले होते अडीच वर्षे शिवसेनेचा, अडीच वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री. तेव्हा बंडखोर उभे केले, आपल्या जागा पाडल्या. तेव्हा शिवसेनेला मुख्यमंत्री देता येणार नाही म्हणत होते. मग आता कसे संभव झाले? आता संभवामी युगे युगे कसे झाले, असा सवाल त्यांनी भाजपाला केला आहे.
‘ते बंडखोर नाहीत, हरामखोर आहेत’
आता आदित्य फिरत आहे. मी ही पुढच्या महिन्यापासून राज्याचा दौरा करणार आहे. त्यांना एक तर शिवसेना संपवायची आहे. ती संपवताना त्यांना ठाकरे आणि शिवसेना हे नाते तोडायचे आहे. ते बंडखोर नाहीत, हरामखोर आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर शिवसेना प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, तुमच्या हिंमतीवर मते मिळवा. प्रत्येकाला आई-वडील प्यारे असतात. जे फुटून गेलेले आहेत, सुदैवाने ज्यांचे आई-वडील सोबत आहेत त्यांनी त्यांना सोबत घेऊन सभा घ्याव्या आणि मते मागावी, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.