अदानींना झेपत नसेल तर…; धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आक्रमक
Uddhav Thackeray Dharavi Redevelopment Project : उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी धारावी पुनर्वसनाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसंच सरकारवरही त्यांनी निशाणा साधला आहे. 'लाडका मित्र योजना' असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. वाचा सविस्तर...
धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. गौतम अदानींना झेपत नसेल तर हे टेंडर रद्द करा आणि दुसऱ्या योग्य व्यक्तीला हे टेंडर द्या, अशी आमची जाहीर मागणी आहे. त्यासाठी पुन्हा ग्बोबल टेंडर मागवा. पण हा मुंबई उध्वस्त करण्याचा डाव, धारावीकरांना उध्वस्त करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
तर टेंडर रद्द करा- ठाकरे
आमचं सरकार आल्यावर अदानींना दिलेलं टेंडर रद्द करण्याचा मुद्दा आहेच. पण आताच या या सरकारने अदानींचं टेंडर का रद्द करू नये? हा आमचा प्रश्न आहे. धारावीकरांवर अन्याय करून मुंबईची अदानी सिटी आम्ही होऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“धारावीचा विकास म्हणजे अदानींचा विकास नव्हे”
धारावीची विकास म्हणजे नेमकं काय? याची तुम्ही व्याख्या आधी सांगा… धारावीचा विकास म्हणजे अदानींचा विकास नव्हे… धारावीतील लोकांचा विकास व्हायला पाहिजे. तिथल्या लोकांना घरं मिळाली पाहिजेत. जर हे त्या विकासकाला जमत नसेल, तर त्याने थेट सांगावं, की आम्हाला झेपत नाही. नवीन टेंडर काढा. पण त्यासाठी मुंबईची विल्हेवाट लावू नका, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. बेसुमार टेडीआर काढून अदानी यांना देण्याचा सरकारचा डाव आहे. तो डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. मुंबईतील सर्वच्या सर्व टीडीआर आम्ही अदानी यांना घेऊ देणार नाही. उद्या ते मुंबईचं नाव बदलून अदानी सिटी असं करतील… पण त्यांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आहे.
धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर मिळालंच पाहिजे. 500 फुटांचं घर मिळालं पाहिजे, अशी शिवसेनेची आग्रही भूमिका कायम आहे. एक बेसुमार काढून अडानींना द्यायचा सरकारचा डाव आहे, तो आम्ही उधळून लावणार आहोत. तो डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.